पनवेल : रामप्रहर वृत्त
श्रावण पौर्णिमा हा दिवस संस्कृत दिन म्हणून विश्वभरात साजरा होतो. सीकेटी विद्यालयात इंग्रजी माध्यमात हा दिवस अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात बुधवारी (दि. 10) साजरा झाला. कार्यक्रमाची सुरूवात जिनल वालावलकर हिने मेधासूक्त पठणाने केली. यानंतर प्रमुख अतिथी मंजिरी फडके तसेच अर्चना ठाकूर यांचे यथोचित स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटक, संवाद, सुभाषित पठण, नर्मदाष्टक पठण, संस्कृत गीत गायन, भाषण असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम संस्कृत भाषेमध्ये सादर केले. संस्कृत शिक्षिका श्रद्धा जोशी यांनी प्रमुख अतिथी मंजिरी फडके यांचा परिचय करून दिला. मंजिरी फडके या शिक्षणतज्ञ असून ‘गुरूकुलम् न्यास’ या संस्थेमार्फत भगवद्गीता प्रचाराचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत. विद्यार्थ्यांना उद्बोधित करताना मंजिरीताईंनी सनातन वेद परंपरेचे महत्त्व विषद केले. तसेच संस्कृत भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगून कथेच्या माध्यमातून आपल्या ध्येयासाठी कसे प्रयत्नशील असावे या विषयी मार्गदर्शन केले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या संचालिका आणि शाळा समिती सदस्या अर्चना ठाकूर यांनी हा कार्यक्रम भव्यदिव्य स्वरूपात साजरा केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांची प्रशंसा केली. संपूर्ण कार्यक्रम संस्कृत भाषेत करून एक वेगळा प्रयत्न केल्याबद्दल मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे शुद्ध संस्कृत भाषेत श्रावणी कर्णेकर आणि अथर्व पाटील यांनी सूत्रसंचलन केले. या वेळी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे, शिक्षक पालक संघाच्या सहसचिव तेजश्री कुलकर्णी तसेच इंग्रजी माध्यमिकच्या पर्यवेक्षिका निरजा मॅडम आदी उपस्थित होते.