पनवेल ः रामप्रहर वृत्त
उसळेल्या सागराला शांत करण्यासाठी सोन्याने मढवलेला नारळ अर्पण करून कोळी बांधवांनी नारळीपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्त पनवेल कोळीवाडा आणि तक्का कोळीवाड्यात ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये कोळी बांधव पारंपरिक वेशभूषा करून मिरवणुकीत सहभागी झाले होते. पनवेल कोळीवाडा येथे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते नारळ समुद्राला अर्पण करण्यात आला.
नारळीपौर्णिमेच्या दिवशी सागराला सोन्याचा नारळ अर्पण केल्यानंतर कोळी बांधव मासेमारीला सुरुवात करतात. पनवेल आणि तक्का कोळीवाड्यात गुरुवारी कोळी बांधव आपल्या पारंपरिक वेशभूषेत या मिरवणुकीत सहभागी झाले होते. या वेळी आगरी कोळी समाजात प्रसिद्ध असेलेल्या ब्रास बँड पथकाने आपली पारंपरिक गिते वाजवात सोहळ्यात लज्जत आणली होती. गुरुवारी दुपारी नारळाची विधिवत पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला.
पनवेल कोळीवाडा याथे नारळी पौर्णिमेचा सण साजरा करतावेळी माजी नगरसेवक अनिल भगत, माजी नगरसेविका रुचिता लोंढे, भाजपचे शहर सरचिटणीस अमरीश मोकल, पोलीस निरीक्षक संजय जोशी, हरिश्चंद्र कोळी, मदन कोळी, महेंद्र उरणकर, कमलाकर कोळी, एकनाथ भोईर, गजानन भगत, प्रभाकर भोईर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते, तर तक्का कोळीवाडा येथील नारळी पौर्णिमा साजरी करताना भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अजय बहिरा, युवा नेते प्रतीक बहिरा उपस्थित होते.
दरम्यान, पनवेल कोळीवाडा येथे नारळीपौर्णिमेचा उत्सव साजरा करतावेळी दहावी आणि बारावीच्या परिक्षांमध्ये सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.