Breaking News

खुनाचा गुन्हा लपविण्यासाठी आत्महत्येचा बनाव

पेण-डोलवी येथील घटना; आरोपींना अटक

पेण ः प्रतिनिधी

पेणमधील वडखळ पोलीस ठाणे हद्दीतील डोलवी येथील देवर्षी नगर येथे किरकोळ कारणावरून पतीने पत्नीला डोक्यात मारहाण केल्याने या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला, परंतु आपले कृत्य लपविण्यासाठी पती व त्याच्या भावाने विवाहितेने गळफास केल्याचा बनाव करून आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु ही आत्महत्या नसून खून केल्याचा गुन्हा उलगडण्यात वडखळ पोलीस यशस्वी कामगिरी केली आहे.  याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डोलवी देवर्षी नगर येथील विवाहिता ऋणाली सतीश म्हात्रे (वय 25) हिने 16 डिसेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंदही करण्यात आली होती. या प्रकरणात वडखळ पोलीस उपनिरिक्षक परशुराम शिंदे यांनी अधिक तपास केला असता वेगळेच सत्य समोर आले. मृत महिला ऋणाली म्हात्रे हिने 16 डिसेंबर रोजी सकाळी 8:15च्या सुमारास तिच्या तीन वर्षांच्या लहान मुलास थंड पाण्याने आंघोळ घातली या गोष्टीचा मनात राग धरून तिचा पती आरोपी सतीश म्हात्रे याने ऋणाली हिला मारहाण केली. या मारहाणीत ऋणालीचा मृत्यू झाला. आपल्या हातून पत्नीचा खून झाल्याचे लक्षात आल्याने घाबरून आरोपी पती सतीश याने सर्व प्रकार त्याचा भाऊ संदेश म्हात्रे याला सांगितला. आपल्यावर आरोप येऊ नये यासाठी या दोघांनी आपसात संगनमत करून मृत ऋणालीला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून पुरावा नष्ट करण्यासाठी आत्महत्येचा बनाव केला. अखेर पोलिसांनी आरोपी सतीश म्हात्रे व संदेश म्हात्रे यांच्याविरोधात भादंवि कलम 302 ,201, 34 गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply