कर्जत : बातमीदार
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कर्जत तालुक्याचे योगदान मोठे आहे, कर्जत तालुक्याच्या लढाऊ बाण्याची नोंद ब्रिटिश सरकारला इंग्लंडमध्ये घ्यावी लागली होती. तरुणांनी हुतात्मा भाई कोतवाल तसेच हिराजी पाटील यांचा आदर्श समोर ठेवावा, असे आवाहन इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांनी शुक्रवारी (दि. 12) नेरळ येथे केले.
देशाच्या अमृत महोत्सवी वर्षनिमित्त नेरळ येथील मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस महाविद्यालयात विशेष सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात शुक्रवारी ‘स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचे योगदान‘ या विषयावर इतिहास संशोधक वसंत कोळंबे बोलत होते. तब्बल 70 क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्याचा लढा कर्जत तालुक्यातून सुरु केला, असा दावा त्यांनी या वेळी केला.
या स्वातंत्र्य लढ्यात गोमाजी पाटील आणि हिराजी पाटील हे पिता-पुत्र लढले आणि हिराजी पाटील हे देशासाठी शाहिद झाले, असे उदाहरण देशाच्या इतिहासात नाही. या दोन्ही हुतात्म्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे, असे मत कोळंबे यांनी या वेळी व्यक्त केले.
हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी यापुढे प्रत्येक वर्षी 2जानेवारी रोजी एनएसएसचे विद्यार्थी सिद्धगड येथे जातील, असे विद्या मंदिर मंडळाचे कोषाध्यक्ष विवेक पोतदार यांनी या वेळी जाहीर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल घरत यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार इंगळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर मोहिते, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सोनम गुप्ता यांच्यासह अध्यापक आणि विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.