मुरूडमध्ये हिमोडायलेसीस मशीनचे उद्घाटन
मुरूड : प्रतिनिधी
मधुमेही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढणे, ही चिंतेची बाब आहे . मुख्यतः गोड पदार्थ सेवन केल्यामुळे मधूमेह होतो आणि मधुमेहामुळे किडनी खराब होते. त्यामुळे शक्यतो गोड पदार्थांचे अतिसेवन टाळा, असे कळकळीचे आवाहन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी मुरूड येथे केले. मुरूडमधील संजीवनी आरोग्य सेवा संस्थेतील हिमोडायलेसीस मशीनचे उद्घाटन डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करीत होेते. मधुमेहापासून बचाव करण्यासाठी समुद्रावर रोज दोन फेर्या मारण्याचा सल्ला त्यांनी या वेळी मुरूडमधील नागरिकांना दिला. पद्मश्री डॉ. लहाने यांच्या प्रेरणेतून संजीवनी आरोग्य केंद्र कार्यरत असून, या केंद्रात पाच तालुक्यांतील रुग्णांना सेवाभावी आरोग्य सेवकांकडून डायलेसीस सेवा दिली जाते, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष विजय सुर्वे यांनी प्रास्ताविकात दिली. या वेळी पॉझिटिव्ह पेशंट केबीन आणि अॅम्बुलन्स शेडचेही उद्घाटन करण्यात आले. स्वामी समर्थ मठाच्या संस्थापिका तृषाताई भोसले यांनी संजीवनी संस्थेला एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. त्यासोबत रुग्णांना लागणारी न्याहरी व औषधांचीदेखील तरतूद करण्याचा मनोदय व्यक्त केला. डॉ. मकबुल कोकाटे, नायब तहसीलदार अमित पुरी, दिलावर महाडकर, मनोज भगत आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासंती उमरोटकर यांनी केले. तहसीलदार रोहन शिंदे, पोलीस निरीक्षक नितीन गवारे, डॉ. विक्रमजीत पाडोळे, राशीद फहीम, प्रमोद भायदे, मंगेश दांडेकर, अजित गुरव, किर्ती शहा यांच्यासह संस्थेचे सदस्य तसेच रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक या वेळी उपस्थित होते. चंद्रकांत अपराध यांनी आभार मानले.