वंजारवाडी येथील शेतकर्याला चार लाख रुपयांचा फटका
कर्जत : प्रतिनिधी
तालुक्यातील वंजारवाडी येथील एका शेतकर्याच्या पाच म्हशींना जिवंत वीज वाहिनीचा धक्का लागून त्या जागीच मरण पावल्या. या पाच म्हशींची किंमत सुमारे चार लाख रुपये असून महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.
कर्जत तालुक्यातील वंजारवाडी येथील चंदू भारद्वाज हे शेतकरी गेल्या वीस-बावीस वर्षांपासून शेती व दुग्धव्यवसाय करीत आहेत. त्यांच्याकडे 12 म्हशी होत्या. सकाळच्या सुमारास गोठ्याची साफसफाई करण्यासाठी म्हशींना बाहेर सोडले होते. थोड्या वेळानंतर त्यांना आणण्यासाठी गेले असता पाच म्हशी मृत झाल्याचे आढळल्या. म्हशी चरत असताना जिवंत वीजवाहिनी तुटून म्हशींच्या अंगावर पडली व त्यामुळे पाच म्हशी मृत झाल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. त्यातील दोन म्हशी दुभत्या तर दोन म्हशी गाभण होत्या. उर्वरित सात म्हशी दुसर्या जागी चरत असल्यामुळे त्या वाचल्या.