आदित्य ठाकरे यांच्या सभेनंतर आमदार भरत गोगावले यांचा पलटवार
महाड : प्रतिनिधी
आम्ही गद्दारी केलेली नाही, आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आजही कायम आहोत, असे असताना आम्हाला गद्दार म्हणणार्यांना येत्या निवडणुकांमध्ये धडा शिकवू, असा पलटवार आमदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केला. आदित्य ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या सभेनंतर आमदार गोगावले यांनी शनिवारी (दि. 20) पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरे आणि माजी मंत्री अनंत गीते यांना सूचक इशारा दिला.
महाडमध्ये युवा सेनेचे अधिकारी आदित्य ठाकरे यांच्या सभेमध्ये शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांच्यावर तोंडसुख घेतले होते. या वेळी आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. शिवसेना सोडून गेलेल्यांचा गद्दार असा उल्लेख करत भविष्यात या आमदारांना विधानसभेची पायरी चढू दिली जाणार नाही, असा इशारा दिला होता. यामुळे या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी आमदार भरत गोगावले यांनी पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला. शिवसेनेतून 40 आमदार आणि 12 खासदार बाहेर पडले, मात्र आम्ही कोणत्याही पक्षात गेलेलो नाही अथवा अन्य पक्ष स्थापन केलेला नाही. त्यामुळे आम्ही गद्दार कसे हे दाखवून द्यावे. आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रामाणिक असून आम्हाला तत्त्व पटली नाहीत म्हणून हा निर्णय घेतला. मूळ शिवसैनिकदेखील आमच्याबरोबर असल्याचा दावा भरत गोगावले यांनी केला. गद्दार म्हणणार्यांना येणार्या काळात धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा सूचक इशारादेखील सभेला उपस्थित असलेल्या पदाधिकार्यांना दिला. या वेळी त्यांनी अनंत गीते यांच्याशी प्रामाणिक राहिल्यानेच ते कायम निवडून आल्याचे सांगितले. त्यामुळे ते आम्हाला काय धडा शिकवण्याची भाषा करतात. यापुढे कसे निवडून येता तेदेखील आम्ही पाहतो, असा इशारा देखील गीते यांना दिला.
सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य माणसाला जे हवे आहे त्या प्रकारचे निर्णय घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळेच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाड, माणगाव आणि पोलादपूर मतदारसंघाकरिता जवळपास 74 कोटी 60 लक्ष रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. या कामांची यादीच आमदार गोगावले यांनी वाचून दाखवली. त्याचप्रमाणे जलजीवन मिशनमधून 32 कोटी रुपये मंजूर केले असून महाडमधील एनडीआरएफ, प्रशासन भवन, शिवसृष्टी ही कामे मार्गी लागतील, असा विश्वास देखील व्यक्त केला.
धरणांची कामे पूर्णत्वास नेली जातील. 10 वर्ष केंद्रीय मंत्री राहिलेल्या अनंत गीते यांनी दहा मुले तरी कामाला लावली का? याचे उत्तर प्रथम देण्याचे आवाहन केले. आमचे सरकार हे सामान्य माणसाला बरोबर घेऊन जाणारे सरकार असून आम्ही कामे करतो म्हणून तळागाळातील माणूस आमच्याबरोबर आहे. त्यामुळे काम करणार्याच्या बरोबर राहायचे की काम न करणार्या बरोबर हे जनताच ठरवेल, असेही सांगितले.