उमरोलीपाठोपाठ सावेळे गटाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली नाराजी
कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी आता उघड होेऊ लागली आहे. पक्षनेतृत्व लक्ष देत नाही आणि कार्यकर्ते वार्यावर आले असून पक्षातील निर्णय घेताना विश्वासात घेतले नाही, तसेच गावोगावी विकास करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी मिळत नसल्याने तालुक्यातील उमरोलीपाठोपाठ सावेळे गटातील कार्यकर्त्यांनीही सामूहिकपणे नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, यापूर्वी उमरोली जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.
शेतकरी कामगार पक्षाला दोन वर्षानंतर कर्जत तालुका चिटणीसपदी श्रीराम राणे यांनी धुरा हातात घेतल्यानंतर पुन्हा एकदा पक्ष पुन्हा सक्रिय होण्यासाठी पदाधिकार्यांच्या नेमणुका करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यामुळे नाराजीचे सुरू उमटू लागले आहेत. उमरोली गटातील शेकाप कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे जिल्हा चिटणीस यांना पाठवून नाराजी व्यक्त केली होती. त्यांनतर तालुक्यातील सावेळे जिल्हा परिषद गटाचे कार्यकर्त्यांनीही बैठक घेऊन आपल्या विभगातील समस्यांबद्दल चर्चा केली. गेली दहा वर्षे याच समस्या कायम असून गावोगावी विकास कामे करण्यासाठी निधी मिळत नाही, पक्षाकडून कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या जात नाहीत तसेच तालुक्यात पक्षाचे निर्णय घेताना विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जात नाहीत असा आरोप कार्यकर्ते करीत आहेत.
सावेळे जिल्हा परिषद गटातील शेकाप कार्यकर्त्यांनी पक्षाकडे आपले म्हणणे मांडले असून नाराजी व्यक्त करणारे पत्र रायगड जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र हजारे यांच्याकडे दिले आहे. सावेळे गटातील विभाग चिटणीस शिवाजी भगत, ज्येष्ठ कार्यकर्ते नंदा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विठ्ठल भुंडेरे, मधूकर पाटील, माजी विभाग चिटणीस विलास भागीत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनंता दळवी, संतोष वैखरे, पंचायत समिती गणाचे चिटणीस महेश कोळंबे, माजी उपसरपंच रामचंद्र भोईर, तसेच दिलीप शेळके, गणेश मसने, प्रसाद म्हात्रे, अनता बागडे आदींनी पक्षाला आपली नाराजी कळविली आहे.