Breaking News

अडीच हजार कामगारांची भोजन व्यवस्था सिडकोच्या पुढाकाराने इस्कॉन संस्थेतर्फे सेवाभावी कार्य

पनवेल : बातमीदार

महामुंबई क्षेत्रात पनवेल येथे वेगात सुरू असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो आणि गृहनिर्माणसारख्या मोठया प्रकल्पांच्या कामावर काम करणार्‍या सुमारे अडीच हजार कामगारांची सिडकोने निवास तसेच भोजनाची व्यवस्था केली आहे. खारघर येथील इस्कॉन ही धार्मिक संस्था हे सेवाभावी काम करीत आहे.

टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर अनेक मजूर, कामगार काम सोडून गावाकडे परतण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने त्यांच्यापुढे प्रकल्पाच्या ठिकाणी राहण्याशिवाय पर्याय नाही. काही कामगार पायी चालत जाण्याचा पर्यायदेखील निवडत आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामधून गावाकडे जाणार्‍या शेकडो कामगारांना वाशी येथील सिडकोच्या प्रदर्शन केंद्रात निवारा देण्यात आला आहे. त्या ठिकाणी त्यांची जेवनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सिडकोचे दक्षिण नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो आणि 95 हजार घरे बांधण्याचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहेत.

या प्रकल्पांवर हजारो मजूर तसेच कामगार काम करीत आहेत. प्रकल्पाच्या ठिकाणीच झोपडया बांधून राहणार्‍या या कामगारांची होणारी उपासमार पाहता सिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी खारघरमधील इस्कॉन या धार्मिक व सामाजिक संस्थेला विनंती करून हातावर पोट असलेल्या या मजुरांच्या दैनंदिन भोजनाची व्यवस्था केली आहे. सर्व प्रकल्पांवरील कामगारांची काळजी घेण्याचे आदेश कंत्राटदार व अधिकार्‍यांना दिलेले असून अडीच हजार कामगारांच्या दैनंदिन जेवणाची व्यवस्था इस्कॉन या संस्थेच्या माध्यमातून मार्गी लावली आहे.

-उलवे येथे अलगीकरण कक्ष उभारणार राज्यात वाढणार्‍या करोना रुग्णांची संख्या पाहता महामुंबई क्षेत्रातील संभाव्य रुग्णांसाठी सिडको उलवे येथील रिकाम्या घरात अथवा वाणिज्यक संकुलात अलगीकरण कक्ष सुरू करणार आहे. त्यासाठी लागणारे डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, होमगार्ड यांची सेवेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात पाच वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांनाही या सेवेची संधी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Check Also

अलेक्झांड्रा थिएटरची इमारत झाली 103 वर्षांची

आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढी मुव्हीज (आजची युवा पिढी चित्रपटाला मुव्हीज म्हणते) पाहण्यासाठी मल्टीप्लेक्स, मोबाईल …

Leave a Reply