Breaking News

टीम इंडियाचा ‘विराट’ विजय

विंडीजला नमवून टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये गुणांचा श्रीगणेशा

अँटिग्वा : वृत्तसंस्था

भारतीय संघाने यजमान वेस्ट इंडिजवर 318 धावांनी विजय मिळवून कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या 419 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचा संपूर्ण संघ 100 धावांत माघारी परतला. अजिंक्य रहाणेची दमदार खेळी आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक मार्‍याला विजयाचे श्रेय जाते. या निकालासह भारताने परदेशातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली.

उपकर्णधार अजिंक्य रहाणेची (102) शतकी खेळी आणि हनुमा विहारी (93) व कर्णधार विराट कोहली (51) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 419 धावांचे आव्हान उभे केले. 420 धावांचे लक्ष्य पाहूनच वेस्ट इंडिज संघाचे धाबे दणाणले होते. त्यात बुमराहने त्यांना हतबल केले. बुमराहने अवघ्या सात धावा देत विंडीजचा निम्मा संघ माघारी पाठवला. त्यानंतर इशांत शर्मा व मोहम्मद शमी यांनी विंडीजचा डाव 100 धावांत गुंडाळण्यात हातभार लावला.

बुमराह आणि शर्मा यांच्या गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी नांगी टाकली. त्यामुळे विंडीजची अवस्था 9 बाद 50 अशी झाली होती. शेवटच्या गड्यासाठी केमार रोच व कमिन्स यांनी 50 धावांची भागीदारी केली आणि संघाला 100चा आकडा गाठून दिला. अखेर इशांत शर्माने रोचला माघारी पाठवत भारताला दणदणीत विजय मिळवून दिला.

कोहलीने टाकले ‘दादा’ला मागे 

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विदेशी भूमीवर हा 12वा कसोटी विजय मिळवला आहे. विराटने सौरव गांगुलीचा विक्रम मोडला आहे. गांगुलीने 28 सामन्यांत भारताचे नेतृत्व करताना 11 सामने जिंकले होते. विराटने 26 सामन्यांतच त्याला मागे टाकले. त्याचबरोबर महेंद्रसिंह धोनी याच्या 27 कसोटी विजयांची बरोबरी केली आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 60 कसोटी सामन्यांत 27 विजय मिळवले होते. विराटने 47व्या कसोटीतच त्याची बरोबरी केली आहे.

जसप्रीत बुमराहच्या बळींचे अर्धशतक

भारताच्या वतीने जसप्रीत बुमराह याने कमी कसोटी सामन्यांत 50 विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. बुमराहचा हा अकरावा कसोटी सामना होता. या सामन्यात त्याने पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत बळींचे अर्धशतक पूर्ण केले. यापूर्वी हा विक्रम व्यंकटेश राजू (6/12 वि. श्रीलंका, 1990) याच्या नावावर होता, पण याहीपेक्षा या पाच विकेट बुमराहसाठी विश्वविक्रमाची नोंद करणार्‍या ठरल्या. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज अशा चारही देशांत एकाच कसोटीत पाच विकेट घेण्याचा पराक्रम करणारा बुमराह हा पहिला भारतीय आणि आशियाई गोलंदाज ठरला. वकार युनिस, वसीम अक्रम, कपील देव, मुथय्या मुरलीधरन, अनिल कुंबळे, हरभजन सिंग आदी दिग्गजांनाही अशी कामगिरी करता आलेली नाही.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply