खोपोली : प्रतिनिधी
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाचे विनायकराव मेटे आग्रही होते. मराठा समाजाला त्यांचे हक्काचे आरक्षण व प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक पूर्णत्वास नेणे, हीच स्वर्गीय विनायक मेटे यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन रायगड जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सुनील पाटील यांनी रविवारी (दि. 21) ताकई (खोपोली) येथे केले. स्व. विनायक मेटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवारी संध्याकाळी खोपोलीतील ताकई विठ्ठल मंदिर सभागृहात शोकसभा आयोजित करण्यात आली होती. मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा पदाधिकारी आणि खोपोली तसेच खालापूर तालुक्यातील मराठा समाज बांधव या शोकसभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी दिवंगत मेटे यांच्या अपघाती मृत्यूबाबत संवेदना व्यक्त करून मराठा समाजाने आपला प्रमुख नेता गमावला असल्याचा भावना व्यक्त केल्या. तसेच अपघातानंतर मदत व प्रत्यक्ष उपचारासाठी झालेल्या विलंबाबत संताप व्यक्त केला.