Breaking News

संततधार पावसामुळे बाजारात शुकशुकाट

कर्जत : बातमीदार

गणेशोत्सव तोंडावर आला असताना कर्जत तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरीप सुरू आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी होणार्‍या खरेदीवर विरजण पडले आहे. पावसाच्या सततच्या रिपरिपीमुळे बाजारात शुकशुकाट दिसत असून, व्यापारीदेखील संकटात आले आहेत.  गणेशोत्सवाची तयारी किमान 15दिवस आधी सुरु होते. यंदा शासनाने सण, उत्सव साजरे करण्यावरील निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी भक्तांची लगबग सुरु आहे.गणेशोत्सवापुर्वी दोन-तीन आठवडे खरेदीसाठी गर्दी होणार या हिशोबाने व्यापार्‍यांनी देखील आपले नियोजन केले होते. किराणा सामान, कपडे आणि सजावट साहित्य यांची दुकाने फुलली आहेत. मात्र मंगळवार (दि. 23)पासून सुरु झालेली पावसाची रिपरिप बुधवारीदेखील सुरूच आहे. पाऊस थांबत नसल्याने गणेशभक्त खरेदीला निघालेला दिसत नाही. त्यामुळे तालुक्यातील कर्जत, नेरळ, कशेळे, कडाव, कळंब या बाजारपेठांत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. ग्राहक फिरकत नसल्याने व्यापारीदेखील हवालदिल झाले आहेत.पावसाची रिपरिप थांबली तर खरेदीसाठी लोक बाहेर पडतील, असे व्यापारी सांगतात, मात्र पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. गणेशोत्सव आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र बाजारातील शुकशुकाट पाहून व्यापारी हवालदिल झाले आहेत. पाऊस असाच राहिल्यास खरेदीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.

थर्माकोल बंद झाल्यामुळे गणेशोत्सवात भक्तांकडून विद्युत रोषणाई केली जाते. आमच्याकडे पूर्वी महिनाभर आधी ग्राहक येण्यास सुरुवात होत असे. मात्र यावर्षी आठ दिवसांवर सण आला तरी भक्तांची खरेदीसाठी गर्दी दिसून येत नाही.

-ललित जैन, सागर इलेक्ट्रिकल, नेरळ

 

गणेशोत्सव म्हटला की, प्रत्येक घरातील व्यक्ती किमान लहान मुलांना तरी नवीन कपड्यांची खरेदी करण्यासाठी बाजारात येत असते. यावर्षी बाजारात मोठी मंदी दिसत असून, निदान शेवटचे दोन-तीन दिवसतरी  गर्दी होईल, अशी अपेक्षा आहे.

-कौशिक वांजळे, रेडिमेड कपडे विक्रेते, कर्जत

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply