Breaking News

आधी बोलणी, मगच भराव करा! मिठेखार-चेहेर ग्रामस्थांचा एल्गार; जेएसडब्ल्यू कंपनीसमोर रास्ता रोको

रेवदंडा : प्रतिनिधी

मिठेखार नजीकच्या आरक्षीत जागेवर भराव करण्यापुर्वी प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांशी सामंजस्य करारानुसार बोलणी करावी, या मागणीसाठी मिठेखार, चेहेर गावातील  प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी रविवारी (दि. 24) जेएसडब्ल्यू कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर रास्तारोको आंदोलन केले.  दरम्यान, कंपनी प्रशासनाने टाकलेला भराव हटविण्याचे लेखी आश्वासन देवून चर्चेची तयारी दर्शविल्यानंतर  तब्ब्ल तीन तासानंतर हे आंदोलन स्थगीत करण्यात आले. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी त्यावेळच्या वेलस्पन कंपनीने मिठेखार-चेहेर येथील शेतकर्‍यांच्या जमिनी   10 जानेवारी 2010 मध्ये एकरी साडेतीन लाख रुपये  भावाने संपादित केल्या होत्या. त्यावेळी मुदतीत कंपनी सुरू करून प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांना नोकरीत सामावून घ्यावे आदी अटी व शर्तीं असलेला सामंजस्य करारात करण्यात आला होता. मात्र नवीन प्रकल्प मुदतीत पुर्ण न करू शकलेल्या वेलस्पन कंपनीने प्रकल्पग्रस्तांची जमीन जेएसडब्ल्यूू कंपनीला हस्तातंरीत केली. जेएसडब्ल्यूू कंपनीने गेल्या पंधरा दिवसापासून मिठेखार-चेहेर नजीकच्या नवीन प्रकल्पाच्या आरक्षीत जागेत भरावाचे काम सुरू केले. त्यावेळी मिठेखार ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला व भराव करण्या अगोदर कंपनीने मिठेखार व चेहेरमधील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांशी बोलणी करावी, अशी मागणी केली. त्याबाबत जिल्हाधिकारी तसेच रेवदंडा पोलिसांकडे निवेदनही दिले होते. मात्र कंपनीने पोलीस बंदोबस्तात मिठेखार ग्रामपंचायतीने लावलेले कुंपण तोडून भरावाचे काम सुरू केले होते. त्यामुळे संप्तत झालेल्या मिठेखार-चेहेर प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी आधी बोलणी, मगच भराव अशी भूमिका घेत टाकलेला भराव उचलण्याची मागणी केली. रविवारी मिठेखारच्या सरपंच सुवर्णा चवरकर व ग्रामपंचायत सदस्य तसेच मोहन ठाकूर, रमेश गायकर (मिठेखार), अजय चवरकर (चेहेर) यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी रविवारी जेएसडब्ल्यू कंपनीच्या मिठेखार प्रवेशद्वारासमोर रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनी प्रकल्पग्रस्ताचे नेते मोहन ठाकूर, अजय चवरकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करून तुर्तास आंदोलन थांबवावे, आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने भराव उचलता येत नाही, परंतू उद्या टाकलेला भराव उचलण्याची जबाबदारी कंपनीने घेतली असल्याचे सांगितले. मात्र भराव काढण्याचे लेखी पत्र द्यावे, असे सांगून प्रकल्पग्रस्त शेतकरी रास्तारोकोवर ठाम होते. तब्बल तीन तास आंदोलन केल्यानंतर रेवदंडा पोलिसांच्या मध्यस्तीने कंपनी व्यवस्थापनाने भराव काढण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply