वाशीत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्था ही माझी मातृसंस्था आहे, असे प्रतिपादन ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये आयोजित विद्यार्थी शिष्यवृत्ती समारंभात ते बोलत होते.
रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये विद्यार्थी कल्याण व विद्यार्थी परिषद समितीच्या वतीने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानातंर्गत संस्थात्मक शिष्यवृत्ती वितरण समारंभ शुक्रवारी (दि. 26) झाला. कॉलेजमध्ये प्रथमच आयोजित हा समारंभ लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला
या समारंभाला कॉलेज विकास समितीचे सदस्य अॅड. पी. सी. पाटील, प्राचार्य डॉ. शुभदा नायक, उपप्राचार्य प्रा. सी. डी. भोसले, डॉ. भारती पाटील, डॉ. राजेश्री घोरपडे, डॉ. प्रतिभा देवणे, डॉ. आबासाहेब सरवदे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
या समारंभात एनसीसी, एनएसएस युनिटमधील तसेच क्रीडा, संशोधन, शैक्षणिक सामाजिक कार्य क्षेत्रातील आणि सांस्कृतिक विभागातील शंभरहून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करून गौरविण्यात आले.
यश-अपयश हे आपल्या मानसिकतेवर अवलंबून असते. विश्वास ठेवून एखादे काम केले, तर आपण आयुष्यात नक्कीच यशस्वी होणार, असे सांगून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांने अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शुभदा नायक यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीचा आढावा मनोगतातून व्यक्त केला.