उरण : बातमीदार
केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्रभूषण राजू मुंबईकर यांच्या पुढाकारातून उरण चिरनेर येथील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना मार्शल आर्ट (कराटे) या सारख्या खेळाचे प्रशिक्षण घेता यावे म्हणून चिरनेर आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत मार्शल आर्ट (कराटे क्लासेस) शिकविण्याच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. संस्थेच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ह्या मोफत कराटे क्लासेस प्रशिक्षणा करिता मुख्य प्रशिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय कराटे कोच गोपाळ म्हात्रे आणि प्रशिक्षक रोहित घरत यांनी विद्यार्थ्यांना कराटे खेळाचे धडे दिले, तर चिरनेर आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना या पुढे सदैव दिल्या जाणार्या मोफत कराटे क्लासेसच्या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचा राजू मुंबईकर यांनी श्रीफळ, फुलं-हार वाढवून शुभारंभ केला. यासोबतच ह्या आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय स्तरांवरील आणि इतर स्तरांवरील क्रीडा स्पर्धांमध्ये व मॅरेथॉनसारख्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन शाळेचे नाव मोठे करता यावं या करिता धावण्याचे (रनिंगचे) प्रशिक्षण देण्याचा शुभारंभदेखील करण्यात आला. या वेळी चिरनेर आदिवासी आश्रम शाळेतील एकूण 255 विद्यार्थीवर्गा सोबतच आंतरराष्ट्रीय कराटे कोच गोपाळ म्हात्रे, कराटे प्रशिक्षक रोहित घरत, शाळेचे मुख्याध्यापक मोरे सर, वैष्णवी मुंबईकर, स्नेहा तावडे आणि शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर वर्ग उपस्थित होते.