नुकसानभरपाई द्या, अन्यथा उग्र आंदोलन -शेतकरी संघटना
सुधागड : रामप्रहर वृत्त
परतीच्या पावसाने रायगडातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यातील शेतकर्यांचे हाताशी आलेले चांगले पिक आडवे झाल्याने शेतकर्यांच्या डोळ्यात अश्रु तरळले आहेत. हे अश्रू पुसण्याचे काम सरकारचे आहे. मात्र पालकमंत्र्यांचा येथे पत्ताच नाही, असा गंभीर आरोप रायगड जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हरिश्चंद्र शिंदे यांनी गुरुवारी (दि.22) केला. आणि नुकसान भरपाई मिळाली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
जिल्ह्यातील भात शेतीचे खूप नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाताला मोड आलेत, तर काही पाण्यात आहे. आत्ताशी कुठे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. आम्ही याबाबत पालकमंत्र्यांना पत्र पाठवले, जिल्हाधिकार्यांना कळविले. मात्र पालकमंत्र्यांचे याकडे लक्ष जात नाही..! विरोधी पक्षातील नेते पाहणी करुन धीर देण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र राज्य सरकार शेतकर्यांच्या या अश्रुंकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे आमच्यावर त्याशिवाय पर्याय नाही, असे हरिश्चंद्र शिंदे म्हणाले.
कोरोना काळातही ज्या शेतकर्यांनी कर्ज फेडले त्यांना कर्ज माफी मिळाली नाही तर काही शेतकर्यांनी कर्ज न घेताही त्यांना कर्जमाफी मिळाली. रायगड जिल्ह्यातल्या शेतकरी अत्यंत अडचणीत आलेला आहे. राज्य शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पण पालकमंत्री इथे येतच नाहीत, आल्या तर एखाद्या उद्घाटनासाठी येतात त्या शेतकर्यांशी बोलत नाही, शेतकर्यांचे अश्रू पुसत नाहीत, असे हरिश्चंद्र शिंदे यांनी सांगितल.