नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आगामी सण-उत्सवांमध्ये खादी ग्रामोद्योगात बनवलेली उत्पादने एकमेकांना भेट म्हणून द्या. तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे असू शकतात, पण त्यात तुम्ही खादीला स्थान दिल्यास व्होकल फॉर लोकल मोहिमेला गती मिळेल, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 28) केले. ते मन की बात या कार्यक्रमात बोलत होते.
पंतप्रधान मोदींनी म्हटले की, स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी ज्या खादीला महात्मा गांधींनी देशाचा स्वाभिमान बनविले होते तीच खादी स्वातंत्र्यानंतर न्यूनगंडाच्या गर्तेत अडकल्याचे दिसत आहे. त्यामुळे खादी आणि खादीशी निगडीत ग्रामोद्योग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. खादीची ही अवस्था अत्यंत क्लेशदायक आहे. आम्ही खादी फॉर नेशन, खादी फॉर फॅशनमध्ये खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशनचा संकल्प जोडला. देशभरातील खादीशी संबंधित असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. देशवासीयांना खादी उत्पादने खरेदी करण्यास प्रोत्साहित केले. खादी हे टिकाऊ, पर्यावरणपूरक कपड्यांचे उदाहरण आहे. खादीमध्ये सर्वांत कमी कार्बन फूटप्रिंट आहे. असे अनेक देश आहेत जिथे तापमान जास्त आहे. त्यामुळे खादीदेखील आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असून जागतिक स्तरावर खादी मोठी भूमिका बजावू शकते, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.
काही दिवसांपूर्वीच मला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. तेथे त्यांनी ’स्वराज दूरदर्शन’ या मालिकेचे स्क्रीनिंग ठेवले होते. देशाच्या तरुण पिढीला स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेल्या न ऐकलेल्या नायक-नायिकांच्या प्रयत्नांची ओळख करून देण्याचा हा एक उत्तम उपक्रम आहे. दर रविवारी रात्री 9 वाजता दूरदर्शनवर ही मालिका प्रसारित केले जाते, जी 75 आठवडे चालणार आहे. वेळ काढून ती स्वतः पहा आणि तुमच्या घरातील मुलांनाही दाखवा, जेणेकरून आपल्या देशात स्वातंत्र्याच्या महान नायकांबद्दल एक नवी जाणीव निर्माण होईल, असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.
अमृत महोत्सवाचा उत्साह
अमृत महोत्सवाचे रंग केवळ भारतातच नाही, तर जगातील इतर देशांमध्येही पाहायला मिळत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी या वेळी सांगितले. बोत्सवानामध्ये राहणार्या एका स्थानिक गीतकाराने भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी 75 देशभक्तीपर गीते गायली. विशेष म्हणजे ही गाणी हिंदी, पंजाबी, गुजराती, बंगाली, तमिळ आणि इतर अनेक भाषांमध्ये गायली गेली, असे सांगून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 2023पर्यंत चालणार असल्याचे ते म्हणाले.
Check Also
पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच
सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …