Breaking News

पनवेल परिसरात वाहनचालकांवर वॉच

महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे जाळे

पनवेल : रामप्रहर वृत्त

कळंबोली-सायन-पनवेल एक्सप्रेसवर नियमांचे उल्लंघन करून वाहने चालवणार्‍या वाहन चालकांना चाप लावण्यासाठी खारघर रेल्वे स्थानक समोरील ओव्हर ब्रिजवर सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तर कळंबोली-गोवा महामार्गावर चार सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही यंत्रणा कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा सिडकोच्या टेलीकॉम विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेला सुध्दा कायदा आणि सुव्यवस्था राखणे तसेच गुन्हेगारीवर आळा घालण्यास सोपस्कार होणार आहे.

सायन-पनवेल महामार्गावरून पुणे तसेच गोवा जाणार्‍या वाहनांचा संख्या मोठी आहे. अनेकदा वाहन चालकाकडून वेगमर्यादेचे आणि इतर नियमांचे पालन होत नाही. यामुळे हा महामार्ग दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा ठरत चालला आहे. त्याचबरोबर अपघाताचे प्रमाणदेखील वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर सिडकोकडून 2016 साली सायन पनवेल महामार्गावर दोन्ही लेनवर खारघर रेल्वे स्थानकासमोरील ओव्हर ब्रिज येथे सहा सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनांवर या यंत्रणेच्या माध्यमातून दंड ठोठावला जातो आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांत पूर्ण झाले आहे. तेव्हापासून या मार्गावरील वाहतूक जलद झाली आहे. या महामार्गावरून जेनपीटीसाठी मार्ग जात असल्याने अवजड वाहतूकीची मोठी वर्दळ असते. अनेकदा अपघातही घडतात. त्याचा आढावा घेत कळंबोली ते टी पॉईंटदरम्यान दिशा दर्शक फलकावर दोन्ही लेनवर चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. ती लवकरच पूर्ण होऊन सप्टेंबर  महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरण होऊन दोन वर्ष उलडून गेली तरी वातूकीला लगाम घालणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नाही. मात्र मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शिवसंग्राम पक्षाचे पक्ष प्रमुख विनायक मेटे त्यांच्या गाडीचा 14 ऑगस्ट रोजी पहाटे पाचच्या  सुमारास अपघात झाल्यानंतर महामार्गावरील असुरक्षीतता समोर आली आहे. यामुळे महामार्गावरील सुरक्षिततेसाठी सिडकोने आत्ता पाऊल उचलले आहे.

दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेरे बसवताना महावितरणकडून येणारी विज जोडणी करण्यासाठी शनिवारी काम हाती घेण्यात आले होते. त्याचबरोबर कॅमेरे नेटवर्कची तपासणी करण्यात येणार आहे. मात्र तास-दोन तास लाईन येत नसल्याने कामाचा खोळंबा होत असल्याचे काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी सांगितले.

अत्याधुनिक कॅमेरे

खारघर रेल्वे स्थानक समोर महामार्गावरील दोन्ही लेनवर सहा कॅमेरे आहेत, तर कळंबोली ते टी पॉईंट या महामार्गावरील दोन्ही लेनवर चार सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत. अत्याधुनिक स्वरुपाचे त्याचबरोबर अ‍ॅव्हरेज स्पीड डिटेक्शन सिस्टीम कॅमेरे महामार्गावर बसवण्यात येत आहेत. ही कॅमेरे विप्रो कंपणीच्या माध्यमातून बसवले जात आहेत. बेलापूर सिडको टेलीकॉम येथून त्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply