Breaking News

दिल्लीला नमवून चेन्नई फायनलमध्ये आज मुंबईशी सामना

चेन्नई : वृत्तसंस्था

आयपीएलच्या इतिहासात यंदा चौथ्यांदा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन तगड्या संघांमध्येच फायनल पाहायला मिळणार आहे. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने विशाखापट्टणममधल्या क्वालिफायर टू सामन्यावर अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. चेन्नईने या सामन्यात दिल्लीचा सहा गडी राखून धुव्वा उडवला.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत नऊ बाद 147 धावांची मजल मारली होती. दिल्लीचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत या सामन्यात आपल्या लौकिकाला पुन्हा जागला. पण समोरच्या एंडने तोडीची साथ न लाभल्याने त्यालाही सढळ हातांनी मोठे फटके खेळता आले नाहीत.

या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करून दिल्लीला नऊ षटकांत तीन बाद 59 असं रोखलं होतं. त्या कठीण परिस्थितीत मैदानात उतरलेल्या रिषभ पंतने एक खिंड लावून धरली आणि दिल्लीची धावगती सातत्याने उंचावत ठेवली. त्याने 25 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकारासह 38 धावांची खेळी उभारली.

वाढतं वय आणि थकलेलं शरीर यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला धोनीचा सर्वोत्तम मॅचफिनिशर हा लौकिक आता ओसरला आहे, पण आयपीएलच्या रणांगणात चेन्नईचा ‘थाला’ अजूनही ट्वेन्टी-20चा सुपर किंग आहे.

आयपीएलच्या अंतिम फेरीमध्ये चेन्नइचा सामना मुंबईशी होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात यंदा चौथ्यांदा मुंबई आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन तगड्या संघांमध्ये फायनल होणार आहे. त्यामुळे कोणता संघ आयपीएलची ट्रॉफी उंचावणार, याची उत्सुकता आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply