Breaking News

सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भुयारी मार्ग आणि रस्त्याची पाहणी

नवीन पनवेल, तळोजात दौरा; नागरिकांना सेवा देण्याचे निर्देश

पनवेल : प्रतिनिधी

नवीन पनवेलमधून पोदीमार्गे पनवेलकडे जाण्यासाठी सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या कामाची सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको व रेल्वे अधिकार्‍यांसह गुरुवारी (दि. 7) संयुक्त पाहणी केली. या वेळी त्यांनी हा मार्ग लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.

नवीन पनवेलमधील सेक्टर 15, 15ए, 16, पोदी व विचुंबे या भागातून राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी पोदीजवळील रेल्वेफाटक ओलांडून किवा एचडीएफसी सर्कल पुलावरून जावे लागते. माथेरान रस्त्याकडून व डी मार्ट भागातून येणारी वाहतूक ही या पुलावरूनच होत असते. या भागाचा विकास झपाट्याने झाल्याने मोठे प्रकल्प उभे राहिले. नागरी वस्ती वाढल्याने वाहतूकही वाढली. त्यामुळे या पुलावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. अशा स्थितीत पोदीजवळ असलेल्या रेल्वेफाटकाचा वापर नागरिक व विद्यार्थी धोकादायक पद्धतीने करतात. त्यामुळे पोदी येथे भुयारी मार्गाची मागणी करण्यात आली होती.

पोदी येथील भुयारी मार्गासाठी ठेकेदाराच्या टेंडरमधील कालावधीप्रमाणे मे 2018मध्ये काम पूर्ण होणे गरजेचे होते, पण डिसेंबर 2017पासून काम बंद पडले होते. याबाबत नगरसेवक मनोज भुजबळ व तेजस कांडपिळे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना माहिती दिली असता, आमदार ठाकूर यांनी हे काम सुरू करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन काम पूर्ण करण्याची मागणी केली होती. या भुयारी मार्गासाठी सिमेंट ब्लॉक आत टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. भविष्यात रेल्वे लाईन वाढल्या, तर अडचण होऊ नये यासाठी पूर्व बाजूला एक जादा ब्लॉक टाकण्यात आला आहे. दोन्ही बाजूच्या रस्त्याचे थोडे काम बाकी आहे. डिसेंबरमध्ये काम पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वे अधिकार्‍यांनी पाहणीच्या वेळी दिली.

महावितरणचे टॉवर हलविण्यासाठी निविदा काढली असून, 13 नोव्हेंबर शेवटची तारीख आहे. लवकरच एजन्सी दिली जाईल, असेही सांगण्यात आले. नवीन पनवेल पोदीमधील अप्रोच रस्ता करण्यास सहा महिने लागतील, असे सिडकोच्या अधिकार्‍यांनी सांगितल्यावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेलमधील वाहतूक कोंडी फुटून इंधनाची बचत होणार असल्याने लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करून मार्ग कसा सुरू करता येईल, याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या.

नवीन पनवेल पोदी येथील पाहणी दौर्‍याच्या वेळी माजी उपमहापौर चारुशीला घरत, प्रभाग ‘ड’चे सभापती तेजस कांडपिळे, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डॉ. भक्तीकुमार दवे, श्रीकांत बापट, डॉ. मनीष बेहेरे, प्रवीण धोंडगे आदी उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply