महावितरणच्या अनागोंदी कारभाराने ग्राहक त्रस्त
खालापूर : प्रतिनिधी
ऐन गणेशोत्सवाच्या काळात वीजपुरवठा खंडित होणे, कमी-अधिक दाबाने वीजपुरवठा होणे असे प्रकार सातत्याने घडत असल्याने खोपोली, खालापूरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. एरव्ही वीज बिल थकले की, जोडण्या तोडण्यात तत्परता दाखविणारे महावितरणचे अधिकार व कर्मचारी सुरळीत वीजपुरवठा करण्यास टाळाटाळ करीत आहेत.
खोपोलीच्या अनेक भागातील वीजपुरवठा नेहमीच खंडित केला जात आहे. गणेशोत्सवाच्या काळात तर वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे तसेच कमी-अधिक दाबाने वीजपुरवठा होत असल्याने खोपोली, खालापुरात विद्युत उपकरणे जळण्याचे प्रकार वाढले आहेत. दरम्यान, जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत वीज बिलात सुट देण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
खालापूर तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत राहावा, याकरिता उपाययोजना करताना महावितरणचे अधिकारी दिसत नाहीत. रस्त्यालगतचे जीर्ण झालेले खांब, त्यावरील टांगत्या वायरी, उघडे डिपी बॉक्स, याबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही लक्ष दिले जात नाही. भुयारी केबल टाकण्याच्या कामाचा बोजवारा उडालेला आहे. विभागातील महावितरण अभियंता फक्त बील वसुलीसाठी ठेवल्यासारखे कारभार करीत आहेत. तर वरिष्ठ अधिकारी वसुलीबाबतचा आढावा घेण्यात मग्न आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांच्या तक्रारीकडे कर्मचारी व अधिकार्यांचे दुर्लक्ष होत आहे. महावितरणच्या या नियोजनशुन्य कारभाराने ग्राहक वैतागले आहेत. या बाबत महावितरणच्या अधिकार्यांबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र सुट्टीचा दिवस असल्याने संपर्क होऊ शकला नाही.
भूमिगत केबल टाकाव्यात, ट्रान्सफॉर्मरची संख्या वाढवावी, कर्मचार्यांची संख्या वाढवावी, ग्राहकांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेण्यात यावी, स्थानिक वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्याबाबत वरिष्ठ अधिकार्यांनी उपाय योजना करावी, आदी मागण्या खालापूर, खोपोलीतील वीज ग्राहक करीत आहेत.
गणेशोत्वाच्या काळात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत. मात्र महावितरणचे कर्मचारी त्याची दखल घेत नाहीत. ज्या प्रकारे वीज बिलांची वसुली महावितरण करते त्याच प्रमाणे ग्राहकांच्या समस्या व अडचणी सोडवल्या तर वसुलीही चागंली होईल. -किरण हाडप, वीज ग्राहक नावंढे, ता. खालापूर