पनवेल : वार्ताहर : पनवेल तालुका गणित विज्ञान अध्यापक मंडळातर्फे विद्यार्थांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम, तसेच शिक्षकांसाठी कार्यशाळा घेतल्या जातात. त्यातील एका उपक्रमांतर्गत गणित संबोध परीक्षा इयत्ता पाचवी व आठवीसाठी घेतली जाते. या परीक्षेतील जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थांचा गौरव सोमवारी (दि. 15) नवीन पनवेल येथील बांठिया स्कूलमध्ये करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल डाएटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. संजय वाघ, प्रवीण देवेरे, जिल्हा गणित विज्ञान अध्यापक मंडळ सचिव सय्यद, बांठिया स्कूलचे मुख्याध्यापक बी. एस. माळी, उपमुख्याध्यापक एल. एस. निंबोळे, पनवेल तालुका गणित विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील, सल्लागार जे. के. कुंभार, एस. बी. शिंदे, एस. बी. सागरे तसेच सर्व सदस्य उपस्थित होते.
प्रास्ताविकात अनिल पाटील यांनी या कार्यक्रमाचा उद्देश, वर्षभर मंडळातर्फे घेतलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. सय्यद यांनी गणित संबोध परीक्षेतील बदल व पुढील वर्षातील नवीन उपक्रम याविषयी माहिती दिली. माळी यांनी विद्यार्थांना आपल्या मनोगतातून संशोधक होण्याचे आवाहन केले. डॉ. संजय वाघ यांनी जीवनातील गणित, विज्ञान विषयाचे महत्त्व सांगितले, तसेच स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन केले.
या वेळी 30 शाळांतील 52 गुणवंत विद्यार्थांचा व पाच उपक्रमशील शाळांचा गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे पनवेल तालुका गणित, विज्ञान अध्यापक मंडळातील सर्व सदस्यांचादेखील सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी चव्हाण, वरिष्ठ विस्तार अधिकारी साबळे यांनी विद्यार्थ्यांना आणि पनवेल तालुका गणित विज्ञान अध्यापक मंडळाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सदस्य व्ही. आर. पाटील यांनी केले.