181 कर्मचारी पुन्हा कामावर हजर
उरण ः वार्ताहर
मुंबई विभागाच्या उरण आगारात संपकरी एसटी कर्मचार्यांचे पुनरागमन झाले आहे. आगारातील 193 कर्मचार्यांपैकी जवळजवळ 181 कर्मचारी पुन्हा कामावर रूजू झाले आहेत. त्यामूळे 90 टक्क्यांहून अधिक बससेवा सुरू झाली असल्याची माहिती उरण आगाराचे व्यवस्थापक सतीश मालचे यांनी दिली आहे.
ऑक्टोबर 2021पासून राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेले होते. या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. त्याचबरोबर महामंडळाचेदेखील प्रचंड आर्थीक नुकसान झाले होते. अनेक चढ -उतार झाल्यानंतर शासनाने संपकरी कर्मचार्यांना समजुतीचा इशारा दिल्यानंतर कर्मचारी हळूहळू कामावर हजर होण्यास सुरुवात झाली आहे. उरण एसटी डेपोतील सुमारे 181 कर्मचारी पुन्हा कामावर हजर झाले आहेत.
जे कर्मचारी हजर आहेत, त्या सर्व कर्मचार्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून वाहक व चालकांना पुन्हा प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सहा चालकांचे प्राथमिक प्रशिक्षण संपल्यावर या महिन्याअखेर बससेवा 100 टक्के पूर्ववत करण्यात येईल. चालू असलेल्या वाहतूक सेवेअंतर्गत उरण आगारातून 38 पैकी 34 गाड्या सोडण्यात येत आहेत. त्यामध्ये दादर, ठाणे, वाशी, पनवेल, अलिबाग, शिर्डी, मालेगाव, ठाणे, पेण, आदी ठिकाणी बससेवा सुरू करण्यात आली आहेत तसेच उरणमधील ग्रामीण लवकरच बस सेवा सुरू करण्यात येईल, अशीही माहिती उरण आगार व्यवस्थापक सतीश मालचे यांनी दिली.