Breaking News

‘मुंबईत भाजपसोबत निवडणूक लढविणार’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप एकत्र निवडणूक लढवणार असून युतीचा महापौर होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौर्‍यानंतर मुख्यमंत्री शिंदे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा उल्लेख करीत धोका देणार्‍यांना जागा दाखवा, असा हल्लाबोल केला. ना. शाह यांनी पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात आक्रमक भूमिका घेत शिंदे गटाच्या साथीने मुंबई जिंकण्याचा निर्धार केला. या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंद दाराआड उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीसंदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांकडे चौकशी केली असता असा कोणताही शब्द देण्यात आला नव्हता, असे सांगण्यात आल्याचा खुलासा केला. पुढे बोलताना त्यांनी अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांच्यासारख्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आम्ही जर शब्द दिला असता तर मुख्यमंत्रीपद द्यायला काही हरकत नव्हती. आमच्याकडे सारा देश आहे. एवढी राज्ये आहेत. आम्ही शब्द दिला असता, तर मुख्यमंत्रीपद दिले असते, असे सांगितल्याचेही नमूद केले.
स्वतःच्या मुख्यमंत्रिपदाबाबत शिंदे म्हणाले की, मी याबाबतीत यापूर्वीदेखील बोललो आहे. हे जे काही घडले आणि आम्ही जो निर्णय घेतला तो राज्याच्या हिताचा झाला. यामध्ये जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहांची संपर्क झाला. त्या वेळी मी विचारले उत्सुकतेपोटी काय आहे नक्की. त्या वेळी त्यांनी सांगितले जर आम्ही बिहारमध्ये नितीश कुमार यांचे संख्याबळ कमी असताना त्यांना दिलेला शब्द पाळला. संख्या कमी होती तरी त्यांना मुख्यमंत्री केले. आज सगळ्यांनाच वाटत होते की भाजपला मुख्यमंत्रीपद हवे म्हणून हे सुरू आहे. त्यांनी जो सर्वांचा समज होता तो गैरसमज ठरवला. माझ्यासोबत 50 लोक असतानाही माझ्यासारख्या बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले. आमच्याकडे अडीच वर्षे आहेत. आम्ही चांगले काम करून दाखवू, असेही ते म्हणाले.
मुंबई मनपावर भगवा फडकवू -उपमुख्यमंत्री फडणवीस
नागपूर : भाजप आणि ओरिजनल शिवसेना म्हणजे शिंदे गट मिळून आम्ही एकत्रित निवडणूक लढवू आणि मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवू, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.
शिंदे गट आणि मनसे मुंबईत भाजपच्या सोबतीने एकत्र लढणार अशा चर्चा सुरू असल्याचे एका पत्रकाराने विचारले असता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व प्रसारमाध्यमांच्या मनातील चर्चा असल्याचे म्हटले. मलादेखील खूप मजा येते जेव्हा मी तुमची पतंगबाजी पाहतो. ज्याला जे मनात येईल तो ते दाखवतो, इंटरप्रिटेशन करतो, असे ते म्हणाले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply