कर्जत : प्रतिनिधी
यंदा कर्जत तालुक्यात भातपिकाच्या पेरण्या वेळेवर झाल्या होत्या मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने भात रोपे हवी तशी तयार झाली नाहीत. तरीही खचून न जाता तालुक्यातील एका प्रगतशील शेतकर्याने पेर पद्धतीने बियाण्याची पेरणी करून भात पिक घेण्याचा निर्णय घेतला आणि तो कमालीचा यशस्वी झाला. यामुळे मुख्य म्हणजे मजुरांची भेडसावणारी समस्या सुटली आणि वेळ व मेहनतसुद्धा वाचली. यंदा वेळेवर आणि चांगला पाऊस होणार या अंदाजाने कर्जत तालुक्यातील शेकर्यांनी उत्साहात पेरण्या केल्या. मात्र त्यानंतर पावसाने मारलेल्या दडीमुळे शेतकर्यांवर पुन्हा पेरण्या करण्याची वेळ आली, परंतु वेळ निघून गेली होती. यावर तालुक्यातील कोषाणे गावातील प्रगतशील शेतकरी हरिश्चंद्र तातू ठोंबरे यांनी पेर पद्धतीने भात बियाणे पेरण्याचा निर्णय घेतला. आपला मुलगा भरत व अन्य एका माणसाला सोबत घेऊन त्यांनी चार एकर जमिनीत केवळ दोन तासात पेर पद्धतीने भात बियाणे पेरले. सहा सात दिवसातच भात रोपे बाहेर आली आणि आता ती शेते हिरवीगार जोमाने डौलत आहेत. जमिनीला थोडा ओलावा आल्यानंतर ठोंबरे यांनी पूर्ण शेतात साधी नांगरणी केली. गवत उगवू नये म्हणून भात बियाण्यात साथी नावाची तणनाशक पावडर मिसळली. त्यांनतर बियाणे पेरले व पुन्हा हलकी नांगरणी केली. त्यामुळे बियाणे मातीत मिसळले गेले. भात रोपांमध्ये थोडे अनावश्यक गवत उगवले. त्यावर त्यांनी युरियामध्येसुद्धा साथी तणनाशक पावडर मिसळून खत मारले. त्यामुळे भातपीक हिरवेगार झाले व अनावश्यक गवत नष्ट झाले. कसई नावाचे गवत आल्यास क्लिचंर नावाचे तणनाशक मारावे, असे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत. या प्रयोगाने त्यांची शेती दृष्ट लागण्यासारखी झाली आहे.
गेल्या वर्षी पावसामुळे वाहून गेलेल्या भात रोपानंतरही मी पेर पद्दतीचा प्रयोग केला होता. मात्र त्यावेळी भात भिजवून मोड आलेले बियाणे पेरले होते. त्यामध्ये फॉरेट पावडर मिसळल्यामुळे पक्षी, पाखरे किंवा खेकडेसुद्धा फिरकले नाहीत. त्यामुळे पीक सुरक्षित राहिले होते. यंदा पेर पद्धतीने भात बियाण्याची पेरणी केली. हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला आहे.
– हरिश्चंद्र ठोंबरे, प्रगतशील शेतकरी, कोषाण, ता. कर्जत