पनवेल : प्रतिनिधी
या वर्षी पनवेल महापालिकेकडे गणेश विसर्जन घाटांचे सिडकोकडून हस्तांतरण झाले आहे. या अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेने गणेशोत्सवापूर्वी विसर्जनाचे घाट बांधण्यापासून ते गणेश विसर्जनापर्यंची सर्व तयारी पूर्ण केली आहे. विसर्जन घाटावर गर्दी होऊ नये यासाठी अॅपद्वारे स्लॉट बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता, मात्र या वर्षी नागरिकांचा उत्साह पाहता पालिकेने गणेश विसर्जनाची जय्यत तयारी केली आहे. महापालिका क्षेत्रात चारही प्रभागांमध्ये जवळपास 61 ठिकाणी गणपती विसर्जन घाटांवर महापालिकेच्या वतीने मंडप, लाईट, टेबल-खुर्ची, जनरेटर, हॅलोजन, स्टेज, बॅरिगेटस्, क्रेन, हायड्रा, निर्माल्य कलश, लाऊड स्पीकर, लाईफ जॅकेट, तराफा ठेवण्यात आला आहे.
घनकचरा आणि आरोग्य विभागाअंतर्गत विसर्जन घाटावर साफसफाईची आणि निर्माल्य कलश ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी विविध घाटांवर पालिकेच्या कर्मचार्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. गणेश विसर्जनावेळी त्या त्या ठिकाणी पथके तैनात करण्यात येणार असून एका अधिकार्याबरोबर सफाई कामगार, स्वच्छता निरीक्षक, प्रभारी स्वच्छता परीक्षक, मुकादम अशी एक टीम असेल. काही ठिकाणी मोबाईल टॉयलेटची सोय केली आहे.
मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन असते, त्या विसर्जन घाटावर महापालिकेतर्फे हायड्राची, क्रेनची सोय करण्यात आली आहे. महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी आरोग्य पथक रुग्णवाहिकेसह तैनात करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागास सज्ज राहण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी फायर स्टेशन आहेत तिथे शिफ्टमध्ये लोकांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
या वर्षी प्रथमच विसर्जनासाठी येणारे घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांचे गणपती यांच्यासाठी कोअर ओसीन सोल्युशन कंपनीच्या माध्यमातून पालिकेने एक अॅप तयार केले असून https://pmc.visarjanslots या लिंकवर नागरिकांना आपले स्लॉट बुक करता येणार आहेत. पनवेल महापालिकेच्या www.panvelcorporation या अधिकृत वेबसाईवरूनही स्लॉट बुकिंग करता येणार आहे.
Check Also
‘दिवाळी पहाट’ने पनवेलकर मंत्रमुग्ध महापालिकेकडून मतदान जनजागृती
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि. 1) पहाटे वडाळे तलाव परिसरात आयोजित …