Breaking News

पनवेलमध्ये गणेश विसर्जनावेळी शॉक लागून 11 जण जखमी

पनवेल : वार्ताहर
पनवेलमधील कोळीवाडा विसर्जन घाटावर शुक्रवारी (दि. 10) रात्री लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात असताना 11 जणांना विजेचा शॉक लागला. जखमींना शहरातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अन्य नेते तसेच पोलिसांनी व महापालिकेच्या अधिकार्‍यांनी रुग्णालयात धाव घेत दुर्घटनाग्रस्तांना व त्यांच्या कुटुंबीयांना सहकार्य करीत आधार दिला.
पनवेल कोळीवाडा येथील विसर्जन घाटाजवळ गणेशभक्तांना पुरेसा उजेड मिळावा यासाठी जनरेटर लावण्यात आला होता, मात्र मुसळधार पावसामुळे जनरेटरची वायर तुटली आणि विसर्जनासाठी आलेल्या 17 वर्षीय मानस सुनील कुंभार या तरुणाच्या अंगावर पडली. हे पाहून कुटुंबीय त्याला वाचविण्यासाठी गेले असता त्यांनाही विजेचा शॉक बसला. यामध्ये सर्वम पनवेलकर (वय 15), तनिष्का प्रसाद पनवेलकर (9 महिने), दिलीप पनवेलकर (65), निहाल चोणकर (5), दिपाली पनवेलकर (24), वेदांत कुंभार (19), दर्शना दयानंद शिवशिवकर (36), हर्षद दिलीप पनवेलकर (31), रितेश पनवेलकर (38), रूपाली पनवेलकर (वय 35) यांना शॉक लागून ते जखमी झाले. त्यांना तातडीने शहरातील विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले. यातील अत्यवस्थ असलेल्या मानस कुंभारला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, आयुक्त गणेश देशमुख, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने आदींनी रुग्णालयात धाव घेत दुर्घटनाग्रस्तांना व त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी करून आढावा घेतला. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply