’चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या सेटवर सन्नाटा पसरला होता. कार्यक्रमाचा टीआरपी कमी होत असल्याने कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय वाहिनीने घेतल्याची बातमी सेटवर आली होती. भाऊ कदमला आता आपल्या घराचा हप्ता कसा भरायचा ही चिंता लागली होती. श्रेया बुगडेने घरात नवीन कपाट घेतले होते. त्यात ठेवायला कपड्यांची खरेदी करायची होती. आता कसे होणार म्हणून ती डॉक्टर निलेश साबळेला विचारत होती. कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे आणि सागर करांडे यांसारख्या लोकांना हसवणार्या कलाकारांना प्रतिस्पर्धी निर्माण झाल्याने आपल्या रोजगाराची चिंता निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय पक्षांत ’निवडणुकीत खेळ चाले’ हा कार्यक्रम जोरात सुरू झाला आहे. त्यामुळे मतदारांची मात्र चांगलीच करमणूक होत आहे, पण यामुळे ’चला हवा येऊ द्या’सारख्या अनेक विनोदी मालिकांचा टीआरपी कमी झाला. त्यामुळे जाहिरातीचे उत्पन्न कमी झाल्याने वाहिन्यांनी या मालिका बंद करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सेटवर सुरू होती.
सध्या सगळ्यांचा आवडता राजकीय विनोदी कलाकार राहुल गांधींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर आहे. त्यामध्ये रस्त्यावर उन्हामुळे चक्कर येऊन पडलेल्या मध्यमवयीन व्यक्तीला पाहून राहुलजी गाडी थांबवतात. त्याच्याजवळ जाऊन खिशातून रूमाल काढून त्याच्या चेहर्यावरील घाम पुसतात. त्याला गाडीत घेतात. राहुलबाबाचे काम पाहून सगळे खूश होतात. इथपर्यंत सर्व चांगले जमून आले, पण हाय रे देवा, गाडीत असलेल्या दुसर्या कॅमेर्याने घात केला. त्यामध्ये ती व्यक्ती राहुलबाबाला सांगते, सर, पुन्हा एकदा घाम पुसा म्हणजे व्हिडीओ चांगला बनेल आणि माझ्या चॅनलवर तो दिवसभर चालवता येईल. ते पाहून प्रेक्षकांची हसून हसून मुरकुंडी वळते.
महाराष्ट्रही यात मागे नाही. आपल्या दादांचे पुत्र आणि शरद पवारांचे नातू राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे मावळमधील उमेदवार पार्थ पवार पाहिल्याच भाषणानंतर सोशल मीडियावर ट्रोल झाल्याने गडबडून गेले. आजोबांना विश्वासात न घेतल्याची खंत त्यांना वाटू लागली. त्यामुळे कोणी सांगेल त्याप्रमाणे ते काम करू लागले. पनवेलवरून चाकरमानी सकाळच्या वेळेस सीएसएमटीकडे मोठ्या प्रमाणात जात असतात. डबा गर्दीने भरलेला असतो. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी यांनी उलट दिशेने सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते पनवेल प्रवास केला. लोकलच्या रिकाम्या डब्यात बसून समस्या जाणून घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल केला, मात्र पार्थ यांनी सकाळच्या वेळेस लोकलमधून उलटा रेल्वे प्रवास करून प्रवाशांच्या कोणत्या समस्या जाणून घेतल्या यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या वेळी ते ज्यांच्याकडून समस्या जाणून घेत आहेत ते महाविद्यालयीन विद्यार्थी नसून एका लोकल न्यूज चॅनेलची टीम असल्याचे आता उघड झाले आहे.
एवढ्यावरच न थांबता बुधवारी रात्री पनवेलमधील मोहल्ला परिसरात पार्थ पवार धावत जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्यात आला. पनवेलमध्ये सभेला येण्यासाठी उशीर झाला असताना गाडी वाहतूक कोंडीत अडकल्याने पार्थ पवार धावत सभेच्या ठिकाणी जात आहेत, अशा आशयाचा मेसेज व्हिडीओसोबत पार्थ पवारच्या पीआर टीमकडून व्हायरल करण्यात आला. पार्थ पवार धावतानाचा व्हिडीओ पनवेलमध्ये वार्यासारखा पसरला. खरंतर पार्थ पवार पनवेलमध्ये त्यावेळी प्रचारासाठी आले होते. या वेळी ते मुस्लीम मोहल्ल्यातील नागरिकांची भेट घेणार होते. सभेसाठी उशीर झाला म्हणून पार्थ पवार पळत सभेच्या ठिकाणी जात आहेत, असा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला, मात्र मोहल्ला परिसरात पार्थ पवार यांची कुठलीही सभा नसल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर वाहतूक कोंडी झाली नसल्याचेही समोर येत आहे. त्यामुळे हा निवडणूकपूर्व स्टंट आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा पार्थ पवार सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहेत.
अशा प्रकारच्या अनेक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसणार असल्याने मतदारांची करमणूक होणार आहे. बाबल्या सांगत होता, सोसायटीत अनेकांनी व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवरील क्लिपमुळे करमणूक होत असल्याने सध्या टीव्ही बंद ठेवून लाईट बिल आणि चॅनेलच्या फीचे पैसे बचत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुढच्या 25 दिवसांत असे अनेक नौटंकीचे खेळ पाहून करमणूक होणार असल्याने ’चला हवा येऊ द्या’च्या भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, डॉक्टर निलेश साबळे यांसारख्या कलाकारांना आपल्या रोजगाराची चिंता वाटू लागली आहे. त्यामुळे डॉक्टरने निवडणूक आयोगाला पत्र लिहून याबाबत तक्रार करावी. ते पत्र पोस्टमनकाका सागर कारंडेबरोबर पाठवावे, असा आदेश थुकरटवाडीचे न्यायमूर्ती भारत गणेशपुरे यांनी दिल्याचे समजते.
नितीन देशमुख (7875036536)