इस्लामाबाद : वृत्तसंस्था
चुकीच्या इंग्रजी वाक्यामुळे विनोदाचा विषय ठरलेला पाकिस्तानचा क्रिकेटपटू उमर अकमल याला आणखी एक धक्का बसला आहे. उमर अकमल याला गुरुवारी (दि. 20) पाकिस्तान क्रिकेट मंडळाने निलंबित केले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासादरम्यान त्याच्याबाबत हा निर्णय घेण्यात आला.
‘पाकिस्तान क्रिकेट मंडळ आज उमर अकमल याला तत्काळ प्रभावाने निलंबित करीत आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असणार्या तपासादरम्यान त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता तो क्रिकेटशी संबंधित कोणत्याही गोष्टींमध्ये सहभागी होऊ शकत नाही,’ असे पीसीबीने जारी केलेल्या पत्रकात नमूद केले आहे. ‘सध्या या प्रकरणातील चौकशी आणि तपास सुरू असल्यामुळे याबाबत आणखी काही भाष्य करणे उचित नाही,’ असेही या पत्रकात म्हटले आहे.
पीसीबीकडून अकमलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, पण अकमलने नियमावलीतील नक्की कोणत्या नियमाचा भंग केला आहे याबाबत मात्र मंडळाकडून स्पष्टीकरण देण्यात आले नाही. अकमल हा पाकिस्तान सुपर लीग
स्पर्धेत क्वेट्टा ग्लॅडिएटर्स संघाकडून खेळत होता, मात्र त्याला आता त्या स्पर्धेतदेखील खेळता येणार नाही. त्याच्या जागी बदली खेळाडूचा अर्ज करण्याची संमती पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून संघ व्यवस्थापनाला देण्यात आली आहे. उमर अकमल हा पाकिस्तानकडून ऑक्टोबर महिन्यात शेवटचा सामना खेळला होता. त्याने आतापर्यंत 16 कसोटी, 121 एकदिवसीय आणि 84 टी-20 सामन्यांत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे.