Breaking News

‘मातोश्री’वर बसून मुख्यमंत्र्याना सर्वसामान्यांचा त्रास कसा कळणार?

चंद्रकांत पाटलांचा यांचा टोला

पुणे ः प्रतिनिधी
राज्य शासन सर्वसामान्यांना एक रुपयांचेही पॅकेज देणार नाही़, मात्र कोरोना नियंत्रणाच्या नावाखाली राज्य शासन जर लॉकडाऊन लागू करणार असेल, तर त्याला आमचा कडवा विरोध असेल, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे. तसेच ‘मातोश्री’वर बसून लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना होणारा त्रास कसा कळणार, असा टोलाही पाटील यांनी ठाकरे सरकारला लगावला़.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची आयुक्तालयात भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पाटील यांनी सांगितले की, कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाऊन हे उत्तर नाही. लॉकडाऊननंतर गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने एक रुपयाचेदेखील पॅकेज जाहीर केले नाही. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतोय हे मातोश्रीमध्ये बसून कळणार नाही.
रात्रीची संचारबंदी ठीक आहे. लॉकडाऊननंतर लोकांनी पुन्हा आपले व्यवहार सुरू केले आहेत. त्यामुळे आम्ही लॉकडाऊनला कडाडून विरोध करू, तसेच व्यापारी आणि इतर सर्वसामान्य लोकही लॉकडाऊनला विरोध करणार आहेत. लॉकडाऊन हा कोरोना नियंत्रणासाठीचा एकमेव उपाय नसून राज्य सरकारने टेस्टिंग सेंटर्सची संख्या वाढवावी. संसर्गजन्य रोग आहे हे मान्य, पण आपले सर्व कामधंदे सोडून घरी बसा हे शक्य नाही, असेही पाटील म्हणाले.
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जनजीवन पूर्वपदावर येत असताना राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याच्या मानसिकतेत असेल, तर त्याला आमचा विरोध असेल. देशाच्या अर्थव्यवस्थेत असंघटित कामगारांचे मोठे योगदान आहे़. लॉकडाऊन लागू केले, तर त्याचा सर्वाधिक फटका हा असंघटित वर्गालाच बसेल. त्यामुळे त्यांनी अगोदर असंघटित क्षेत्रातील हातावर पोट असणार्‍याना पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.
राष्ट्रवादीच्या विरोधामुळे मुख्यमंत्र्यांची कोंडी
राष्ट्रवादीनेही लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नाही, अशी भूमिका घेतलीय. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरेंची कोंडी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते व अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनीही लॉकडाऊनला विरोध दर्शविला. राज्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत हे सत्य आहे, पण लॉकडाऊन हा अंतिम पर्याय होऊ शकत नाही. तसा आग्रहच आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे नवाब मलिक म्हणाले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply