Breaking News

नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्डे भरण्यासाठी गुरुवारी भाजपचा सिडकोविरोधात ‘रास्ता रोको’

पनवेल : प्रतिनिधी
नवीन पनवेल-माथेरान महामार्गाला जोडणार्‍या उड्डाणपुलाची दूरवस्था झाल्याने त्या ठिकाणी दररोज वाहतूक कोंडी तसेच अपघात घडत आहेत. त्यामुळे हा उड्डाणपूल खड्डेमुक्त करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. 22) सकाळी 11 वाजता पुलावर रास्ता रोको करण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र माजी नगराध्यक्ष व भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी सिडकोच्या मुख्य अभियंत्यांना दिले आहे.
नवीन पनवेल येथील उड्डाणपुलामुळे पनवेल तालुक्यातील नेरे आणि माथेरानकडे जाणारी शेकडो गावे, वाड्या, पाडे जोडले गेले असून दळणवळणाचा हा प्रमुख मार्ग आहे. या उड्डाणपुलाची पावसामुळे दूरवस्था झाली आहे. त्यामुळे परिसरातील शाळेत जाणारे हजारो विद्यार्थी, नोकरदार महिला व पुरुष, ज्येष्ठ नागरिक, लहान-मोठे व्यावसायिक व ग्रामीण भागातून रानभाज्या, फळे-फुले विक्रीसाठी घेऊन येणारे यांना येथून जाताना त्रास सहन करावा लागतो आहे. या खड्ड्यांमुळे रोज अपघात होऊन अनेक जण जखमी होत आहेत. काहींना कायमचे जायबंदी व्हावे लागत आहे. या पुलावरील रहदारीचा विचार करता पुलाच्या उतारावरील दोन्ही बाजूला सिमेंट काँक्रिटीकरण होणे गरजेचे असताना सिडको त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. याबाबत तक्रार केल्यावर सिडको पावसाळ्यात तात्पुरते हे खड्डे पेव्हर ब्लॉकने बुजवत असते, मात्र त्यामुळे भीक नको, पण कुत्रे आवर असेच म्हणण्याची वेळ येते.
नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्डे बुजविण्यासाठी व त्याच्या सिमेंट  काँक्रिटीकरणच्या कामासाठी गुरुवारी सकाळी 11 वाजता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उड्डाणपुलावरील वाहतूक रोखून धरणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष व भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी सिडकोच्या मुख्य अभियंत्यांना पत्राद्वारे दिला आहे. या पत्रावर भाजपचे  शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी नगरसेवक मनोज भुजबळ, संतोष शेट्टी, प्रकाश बिनेदार, समीर ठाकूर, माजी नगरसेविका सुशीला घरत, अ‍ॅड. वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील घरत यांच्या सह्या आहेत.

नवीन पनवेल उड्डाणपुलावरील रस्ता दरवर्षी खराब होत असतो. यंदा मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने मी 7 जुलै रोजी सिडकोला पत्र दिले होते, पण त्यांनी काहीच केले नाही. पुलाच्या दोन्ही बाजूला उतारावरील  खड्डे पावसाळ्यात तात्पुरते पेव्हर ब्लॉकने भरण्यापेक्षा तो रस्ता सिमेंट  काँक्रिटचा करावा, अशी आमची मागणी आहे. सिडको त्याकडे लक्ष देत नसल्याने आम्ही आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी रास्ता रोको करणार आहोत.
-संदीप पाटील, भाजप पनवेल शहर उपाध्यक्ष

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply