खालापूर : प्रतिनिधी
बोरघाटातील मंकी हिलजवळ सेल्फी काढत असताना मालगाडीची धडक बसून खालापुरातील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. 18) घडली. राकेश पवार (वय 23, रा. सावरोली) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
खोपोलीतील काही तरुण खोपोलीतील झेनिथ धबधबा करून वर असणार्या डोंगरावर पायी चालत पाऊसाचा आनंद लुटत मंकी हिलजवळ गेले होते. परतीच्या प्रवासात राकेश हा मुंबई-पुणे लोहमार्गाशेजारी फोटोग्राफी करीत असताना भरधाव येणार्या मालगाडीची धडक त्याला बसली. त्यात तो जखमी झाला. ग्रुपमधील एका युवकाने धावत जाऊन ती मालगाडी थांबवली आणि त्याच मालगाडीतून राकेशला कर्जत येथे रुग्णालयात नेले जात असताना दुर्दैवाने वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
पेशाने इंजिनिअर राकेश पवार हा अल्टा कंपनीत कायमस्वरूपी नोकरीस होता. वडील आजारी असल्याने कुटुंबाचा भार तो उचलत असे. गावातील नागरिकांच्या सुखदुःखात राकेश सहभागी होत असे. समाजकारणाची आवड असल्याने पंचक्रोशीतील होतकरू तरुण म्हणून त्याचा गवगवा होता. त्याच्या अपघाती निधनाने सावरोली गावावर शोककळा पसरली आहे.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper