शरीरावर जखमा; पोलिसांचा तपास सुरू
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील मोरबे धरणात एक महिला व एक पुरुष असे दोन मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ते बुडाले? त्यांनी आत्महत्या केली? की कुणी त्यांची हत्या करून पाण्यात फेकून दिले याबाबत उलट सुलट चर्चा केली जात आहे, मात्र संबंधित महिला व पुरुषाच्या शरीरावर जखमा झाल्याचे दिसून आल्याने घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. त्या दृष्टीने खालापूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मोरबे धरणात महिला व पुरुषांचे मृतदेह असल्याची खबर खालापूर पोलिसांना रविवारी (दि. 25) सकाळी मिळाली. त्यानुसार पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक तरुणांनी धरणातून दोन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. पंढरीनाथ विष्णू सखुंडे (वय 40, रा. पनवेल) व प्रतिभा प्रकाश म्हात्रे (36, मोहो, चिखले, पनवेल) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.
पोलिसांनी मृतदेहांची तपासणी केली असता दोघांच्याही शरीरावर जखमा दिसून आल्या आहेत. त्यामुळे या घटनेत घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, निरीक्षक बाळा कुंभार व सहाय्यक निरीक्षक सूर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.