Breaking News

‘निर्यात कार्यशाळेमुळे पुस्तकी ज्ञान व प्रत्यक्ष व्यावसायिक अनुभव यातील अंतर कमी होईल’

अलिबाग : जिमाका

जिल्ह्यातील सर्व सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग क्षेत्रातील निर्यातक्षम उद्योजकांना मार्गदर्शन व्हावे, याकरिता आयोजित केलेल्या एकदिवसीय निर्यात कार्यशाळेच्या माध्यमातून पुस्तकी ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव यातील अंतर कमी होऊ शकेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सोमवारी (दि. 27) अलिबाग येथे व्यक्त केला. उद्योग विभाग, उद्योग संचालनालय आणि लघुउद्योग विकास बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी अलिबागमधील जिल्हा नियोजन भवन येथे गुंतवणूक, आयात-निर्यात, व्यवसाय सुलभीकरण आणि एक जिल्हा एक उत्पादन या विषयावर निर्यात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा उद्योग केंद्र, लघुउद्योग विकास बँक, कृषी विभाग, औद्योगिक महामंडळ अशा सर्वांनी एकमेकांमध्ये समन्वय साधून व्यवसाय करणार्‍यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी या वेळी केली. जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर पुढे म्हणाले की,  सध्या रायगड जिल्ह्यात 208 लहान मोठे औद्योगिक प्रकल्प असून यामध्ये सुमारे 45 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे तर सुमारे 20 ते 22 हजार लोकांना यातून रोजगार प्राप्त झाला आहे.  केंद्र शासनाच्या वाणिज्य मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या डायरेक्टर जनरल ऑफ कमर्शिअल इंटलिजन्स या विभागाद्वारे 2021-22 या आर्थिक वर्षाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र हे देशात दुसर्‍या क्रमांकाचे निर्यात राज्य असून एकूण निर्यात पाच लाख 45 हजार कोटी रुपये असून रायगड जिल्ह्यात एकूण निर्यात सुमारे  42 हजार कोटी रुपये इतकी आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी. एस. हरळय्या यांनी प्रास्ताविक केले. किरण करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले. बँक ऑफ इंडियाच्या क्षेत्रीय प्रबंधक शंपा बिश्वास, विदेश व्यापार महासंचालनालयाचे सुदर्शन येलाराम, जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले, पणन महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक भास्कर पाटील, पनवेल सहकारी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विजय लोखंडे, आर्कोस इंडस्ट्रियल इस्टेटचे मारुती पवार, मैत्री संस्थेचे नोडल ऑफिसर कुंभलवार, लघु उद्योग विकास बँकेच्या नीतू थारकन, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी, इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे स्वप्निल बोभाटे, मरीन प्रॉडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या मंगल पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक शामकांत चकोर, आंबा निर्यात उद्योजक संदेश पाटील यांचयसह जिल्ह्यातील निर्यातक्षम उद्योजक व नवउद्योजक आदी या निर्यात कार्यशाळेमध्ये सहभागी झाले होते. या वेळी आयात-निर्यात व्यवसाय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी आपले अनुभव सांगितले. जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक शाम चकोर यांनी आभार मानले. या निर्यात कार्यशाळेच्या निमित्ताने लघु उद्योग समूहातील तसेच प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील लाभार्थ्यांनी त्यांच्या व्यवसायाबाबतचे स्टॉल प्रदर्शन भरविले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.  महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, बँक ऑफ इंडियाच्या क्षेत्रीय प्रबंधक शंपा बिश्वास, विदेश व्यापार महासंचालनालयाचे महासंचालक सुदर्शन येलाराम, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी. एस. हरळय्या, जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले आदी उपस्थित होते.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply