Breaking News

नवी मुंबईत दिलासादायक चित्र

तीन कोरोना काळजी केंद्र तात्पुरती बंद

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवीन रुग्णांत झालेली घट तसेच उपचाराधीन रुग्णसंख्याही घटल्याचे दिलासादायक चित्र नवी मुंबईत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांमुळे भरलेल्या खाटा आता रिकाम्या होत आहेत.  शहरातील तीन कोरोना काळजी केंद्रांत सध्या एकही बाधित नसल्याने ती तात्पुरती बंद करण्यात आली असून पाच केंद्रात तात्पुरता प्रवेश बंद केला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची संख्या 43,600 पेक्षा जास्त झाली आहे, तर 878 जणांचा मृत्यू झाला आहे. सात महिन्यांपासून सुरू असलेला करोनाचा प्रादुर्भाव आता कमी होत आहे. महिनाभरात नव्या करोना रुग्णांबरोबरच उपचाराधीन रुग्णांची संख्याही घटली आहे. प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये महिनाभरात 1147 रुग्ण कमी झाले आहेत. दोन हजार 48 रुग्ण हे उपचार घेत आहेत.

कोरोना नियंत्रणासाठी नवी मुंबईत विविध उपनगरात करोना काळजी केंद्रे निर्माण केली आहेत. पालिकेच्या समाजमंदिरामध्ये प्राधान्याने ही केंद्रे आहेत. वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्राबरोबरच निर्यात भवन तसेच राधास्वामी सत्संग भवन अशा विविध ठिकाणीही मोठ्या स्वरूपात ही काळजी केंद्रे उभारली आहेत. पंधरा दिवसांपूर्वी सर्व काळजी केंद्रात बाधितांची संख्या जास्त होती. मात्र आता करोनाबाधितांत दिवसेंदिवस घट  होत असल्याने पालिका प्रशासन ती तात्पुरती बंद केली आहेत.

वाशी सेक्टर 14, वारकरी भवन बेलापूर तसेच इंडिया बुल्स येथे एकही करोनाबाधित नाही. इंडिया बुल्स येथील प्रवेश अगोदरच बंद करण्यात आला आहे. आता या दोन केंद्रांतही एकही रुग्ण नसल्याने ते तात्पुरते बंद करण्यात आले आहे. इतर पाच करोना काळजी केंद्रांत नवीन प्रवेश बंद केला असून उपचार घेत असलेला शेवटचा रुग्ण घरी सोडल्यानंतर तीही तात्पुरती बंद करण्यात येणार आहेत. आता चार प्रमुख काळजी केंद्रांवरच उपचार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात सिडको प्रदर्शनी केंद्र, राधास्वामी सत्संग भवन, निर्यात भवन व डॉ.डी.वाय पाटील रुग्णालयाचा समावश आहे.

पालिका प्रशासनाने इतर ठिकाणची आरोग्यव्यवस्था तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पालिकेच्या वाशी रुग्णालयातील नवीन प्रवेशही बंद केला आहे. त्यामुळे नवीन दाखल रुग्ण ही डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात हलविण्यास प्रधान्य दिले जात आहे. त्यामुळे महिनाभरात फक्त या एकमेव रुग्णालयातील करोनाबाधितांची संख्या ही 200 वरून 280 वर गेली आहे.

नवी मुंबई शहरातील कोरोनाची स्थिती अत्यंत दिलासादायक आहे, परंतु म्हणून पालिका प्रशासन व नागरिकांनीही बिनधास्त राहणे योग्य नाही. अमेरिकेत तिसरी, तर इटली, फ्रान्समध्ये दुसरी लाट आली आहे. त्यामुळे शहरात उपचाराधीन रुग्ण कमी झाल्याने काही केंद्रे तात्पुरती बंद केली असली तरी नागरिकांनी नियमांचे पालन करून पालिकेला सहकार्य करावे.

-अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply