Breaking News

लेखी आश्वासन द्या; अन्यथा जनआंदोलन करण्याचा कोलाड पाटबंधारे विभागाला ग्रामस्थांचा इशारा

धाटाव : प्रतिनिधी

आंबेवाडी किल्ला ते निवी विभाग कालव्याला डिसेंबर महिन्यात पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन द्यावे, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा रोहा तालुक्यातील वाशी, लांढर, बोरघर, तळाघर, निवी हद्दीतील ग्रामस्थांनी रोह्याचे तहसीलदार व कोलाड पाटबंधारे विभागाला बुधवारी (दि. 28) निवेदनाद्वारे दिला. देखभाल, दुरुस्तीच्या नावाखाली कोलाड पाटबंधारे विभागाच्या आंबेवाडी किल्ला ते निवी विभाग कालव्याला गेल्या आठ-दहा वर्षापासून पाणी सोडण्यात येत नाही. या कालव्याच्या पाण्यासाठी रोहा तालुक्यातील  वाशी, लांढर, बोरघर, तळाघर, निवी हद्दीतील लाभार्थी शेतीकरी, ग्रामस्थ आक्रमक झाले त्यांनी रविवारी महादेव वाडीमधील मंदिरात बैठक घेऊन पाणी समन्वय समिती स्थापन केली. तसेच कालव्याच्या पाण्यासाठी आंदोलन उभारण्याचा निर्धार केला होता. या बैठकीत ठरल्याप्रमाणे पाणी समन्वय समितीच्या प्रतिनिधींनी बुधवारी तहसीलदार कविता जाधव आणि रायगड पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता दिपेश्री राजभोज यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. कालव्याला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन पंधरा दिवसात दिले नाही तर कोलाड पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. या वेळी विठ्ठल मोरे, सरपंच मनोज कळंबे, तुकाराम भगत, राकेश बामगुडे, राजेंद्र जाधव, सागर भगत, रवी मोरे, किशोर कांबळे, सुरेश साळवी, संजय भगत यांच्यासह विभागातील ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी झालेल्या चर्चेत कालव्याच्या पाण्याबाबत पाटबंधारेच्या अधिकार्‍यांसमवेत तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन तहसीलदार कविता जाधव यांनी दिले.

आंबेवाडी किल्ला ते निवी विभाग कालव्याच्या दुरुस्ती, साफसफाईच्या कामाचा तातडीने आढावा घेण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत. या कालव्याला पाणी सोडण्याबाबत कार्यवाही केली जाईल.

-दिपेश्री राजभोज, कार्यकारी अभियंता, रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply