Breaking News

रायगडात 77 हजार 246 गोवंश पशुधनाचे लसीकरण

अलिबाग ः प्रतिनिधी

लम्पी स्किन या पशुधनाच्या विषाणूजन्य संसर्गिय आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी रायगड जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, प्रतिबंधक लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 77 हजार 246 गोवंश पशूधनाचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम यांनी दिली आहे. लम्पी स्कीन हा पशुधानातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे, मात्र हा आजार जनावरांपासून माणसांना होत नाही. यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. हा आजार गोवांशिय पशूधनात जास्त प्रमाणात आढळतो. या आजाराच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येत आहे. एखादे लम्पी संशयित जनावर आढळल्यास ते जनावर इतर जनावरांच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घेतली जात आहे. गोठ्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. पाच किमी परिसरातील जनावरांचे तत्काल लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण एक लाख 76 हजार 775 गोवंश वर्गातील पशुधन असून, आत्तापर्यंत 77 हजार 246 गोवंश पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत सहा हजार 436 संशयित जनावरांची तपासणी करण्यात आली, यामधील 55 जनावरांना लम्पी संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. यामधील  33 जनावरांनी लम्पीवर मात केली असून, चार जनावरांचा मृत्यू झाला आहे, तर 18 जनावरांवर उपचार सुरू आहेत.

पशुधनात लम्पी आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित पशुवैद्यकीय चिकिस्तालय किंवा 1962 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यात गोवंश वर्गिय पशुधनाचे 100 टक्के लसिकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गोवंश वर्गिय पशु पालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून, लसीकरण करून घ्यावे, तसेच गावात लसीकरण मोहीम सुरू असताना ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

-डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप 

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply