Breaking News

बोरघाटात डांबराच्या टँकरने घेतला पेट; वाहतुकीचा खोळंबा

खालापूर : प्रतिनिधी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटातील एचओसी ब्रिज मॅजिक पॉईंटजवळ डांबर वाहतूक करणार्‍या टँकरला बुधवारी (दि. 23)सायंकाळी 7च्या सुमारास अचानक आग लागली. खोपोली आणि महामार्गावरील अग्निशमन दलाच्या जवानांनी लागलीच धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेमुळे द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुमारे 20 मिनिटे खोळंबली होती.

या घटनेचे वृत्त समजताच देवदूत यंत्रणा, खोपोली फायर ब्रिगेडची टीम, आयआरबी पेट्रोलिंग, बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा, अपघात  मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य घटनास्थळी पोचले. त्यांनी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये भाग घेत आग पुर्णपणे आटोक्यात आणली. कुलिंगचे काम झाल्यानंतर द्रुतगती मार्गावरील थांबलेली वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

मोर्बा घाटात एसटी-दुचाकी अपघात; एकाचा मृत्यू

माणगाव : प्रतिनिधी

माणगाव-पुणे रस्त्यावरील मोर्बा घाटात सुर्ले गावच्या हद्दीत बुधवारी (दि. 23) दुपारी एसटी बस व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला.

बसचालक सुभाष रामराव वाघमारे (वय 42, मूळ रा. बागन टाकली, जि. नांदेड, सध्या रा. श्रीवर्धन) हे त्यांच्या ताब्यातील श्रीवर्धन ते मुंबई एसटी बस (एमएच-20, बीएल-2915) घेऊन जात होते. त्याच वेळी रुपेश विठोबा म्हस्के (वय 34, रा. मुगवली, ता. माणगाव) आणि मारुती धोंडू हिलम (वय 37, रा. खरवली आदिवासीवाडी, ता. माणगाव) हे दोघे दुचाकी (एमएच-12,एवाय-570) वरून माणगाव बाजूकडून साई गावाकडे जात होते. माणगाव-पुणे रस्त्यावरील सुर्ले गावच्या हद्दीत बुधवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकीमध्ये अपघातात झाला. त्यात दुचाकी रोडवर खाली पडल्याने पाठीमागे बसलेल्या मारुती हिलम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी बसचालक सुभाष वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादिवरून दुचाकी चालक रुपेश म्हस्के याच्यावर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक फौजदार एस. जी. भोजकर हे करीत आहेत.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply