Breaking News

बिहारमध्ये भाजपची भरारी

गतवेळेच्या तुलनेत 21 जागा वाढल्या

पाटणा : वृत्तसंस्था
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित लोकशाही आघाडी (एनडीए)ने 125 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपने या निकालात भरारी घेतली आहे. भाजपला 2015मध्ये 53 जागा मिळाल्या होत्या. यंदा 74 जागी ‘कमळ’ फुलले आहे. तब्बल 21 जागा जास्त जिंकून भाजपने जबरदस्त यश मिळविले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया बुधवारी (दि. 11) पहाटेपर्यंत सुरू होती. सर्व 243 जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये एनडीएने 125 जागी विजय संपादन केला, तर महाआघाडीने 110 जागांपर्यंत मजल मारली. एनडीएमध्ये 74 जागा भाजपने, 43 जागा जनता दल युनायटेड आणि मित्र पक्षांनी आठ जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत जदयूला फटका बसला. गतवेळी 71 जागा जिंकलेल्या जदयूला या वेळी 28 जागांचा तोटा झाला आहे.
दुसरीकडे महाआघाडीत राष्ट्रीय जनता दलने सर्वाधिक 75 जागा जिंकल्या, मात्र यंदा त्यांच्या पाच जागा घटल्या. राजदने 2015 साली 80 जागा मिळविल्या होत्या. सहकारी काँग्रेसलाही फटका बसला असून, नऊ जागांवर समाधान मानावे लागले. गेल्या वेळी 27 जागा जिंकणार्‍या काँग्रेसचे या वेळी आठ जागांचे नुकसान झाले आहे, तर लोक जनशक्ति पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. शिवसेना, राष्ट्रवादीला ‘नोटा’पेक्षा कमी मते
महाराष्ट्रात महाआघाडीमध्ये असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सीमोल्लंघनाचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. एवढेच नव्हे तर या दोन्ही पक्षांना नोटा (उमेदवारांना मत नाकारण्याचा पर्याय) पेक्षाही कमी मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला 0.22 टक्केच मते मिळाली, तर शिवसेनेला त्याहून कमी म्हणजे 0.04 टक्के मते पडली आहेत. याउलट नोटा पर्यायासाठी 1.71 टक्के मतदान झाले आहे.

बिहारने जगाला लोकशाहीचा पहिला धडा शिकवला. लोकशाही कशा प्रकारे बळकट केली जाते हे आज पुन्हा एकदा बिहारने जगाला दाखवून दिले. बिहारमधील गरीब, वंचित आणि महिलांनी विक्रमी मतदान करून विकासासाठी आपला निर्णायक निर्णय दिला आहे.
-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

जनतेचा कौल पंतप्रधान मोदींवरील विश्वासाचे प्रतिक : देवेंद्र फडणवीस
मुंबई : बिहार व अन्य राज्यांत भाजपने चांगले यश मिळविले. त्यामुळे मोदी व भाजप यांची लोकप्रियता कायम असल्याचे स्पष्ट झाले. बिहारच्या निवडणुकीसाठी भाजपकडून प्रभारी म्हणून काम पाहणारे देवेंद्र फडणवीस यांनी या विजयानंतर जनतेचे आभार मानले आहेत. बिहारच्या जनतेने त्यांना विकास हवा असून, जंगलराज नको आहे हे दाखवून दिले तसेच देशातील 11 राज्यांमधील पोटनिवडणुकांमध्येही भाजपने मोठे यश मिळवले आहे. बिहारबरोबरच या राज्यांमध्ये जनतेने भाजपला दिलेला कौल हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील विश्वासाचे प्रतिक आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

पोटनिवडणुकांमध्येही भाजपचा दबदबा
नवी दिल्ली : देशभरातील 11 राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपने दणदणीत यश मिळविले आहे. भाजप आणि युतीने एकूण 59 जागांपैकी 41 जागांवर कब्जा केला आहे, तर काँग्रेस आणि इतरांच्या पारड्यात 19 जागा गेल्या.
गुजरातमध्ये भाजपने काँग्रेसकडून आठ जागा हिसकावून घेतल्या. यामध्ये सौराष्ट्रातील पाच आणि तीन जागा आदिवासीबहुल भागातून जिंकल्या. यामुळे आता गुजरातमधील 182 विधानसभेच्या जागांपैकी भाजपचे संख्याबळ 111, तर काँग्रेसचे संख्याबळ 65 इतके झाले आहे. गुजरातखालोखाल मध्य प्रदेशात भाजपने 28 पैकी 19 जागांवर जबरदस्त विजय मिळवला.
मणिपूर हे तिसरे राज्य आहे जिथे भाजपने काँग्रेसची पकड असणार्‍या चार जागांवर विजय मिळवला. तेथील काँग्रेसची पाचवी जागा अपक्ष आमदाराने पटकावली. उत्तर प्रदेशात भाजपने आपल्या सहाच्या सहा जागा राखल्या. कर्नाटकमध्येही भाजपने घोडदौड कायमी ठेवली. तेथील दोन्ही जागा भाजपने जिंकल्या. तेलंगणात पहिल्यांदाच भाजपने मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची जागा घेतली आहे.
झारखंडमध्ये सत्ताधारी जेएमएम काँग्रेस आघाडीने दोन्ही जागा जिंकल्या आहेत. ओडिशामध्ये बिजू जनता दलाने दोन्हीही जागा आपल्याकडेच राखल्या आहेत. नागलॅण्डमध्ये अपक्षांनी दोन्हीही जागा जिंकल्या आहेत. छत्तीसगड व हरियानामध्ये प्रत्येकी एका जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला, तर तेलंगणामध्ये भाजपने तेलंगणा राष्ट्र समितीला झटका दिला.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply