माणगाव : प्रतिनिधी
वणवे, वृक्षतोड आणि कोळशांच्या भट्ट्या यामुळे कोकणची वनसंपत्ती नष्ट करणार्या गुन्हेगारांवर जरब बसविण्याच्या दृष्टीने वनखात्याच्या फिरत्या पथकाने आता जोरदार पावले उचलली आहेत. रोहा येथील वनखात्याच्या संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज सकाळी रातवड गावातील विलास सुर्वे यांच्या मालकीच्या जागेत धाड टाकून कोळशाच्या 111 पोती जप्त करण्यात आल्या आहेत. या वेळी पथकासोबत गेलेल्या वनप्रेमी विनोद पालकर यांना कोळसा साठविणार्या विलास सुर्वे व त्यांच्या कामगारांकडून मारहाण झाली असून त्यांचे काही पूर्ववैमनस्य असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी (2 मे) 10 वाजण्याच्या सुमारास रोहा येथील संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन पथकाला मिळालेल्या माहितीनुसार रातवड येथील मुंबई-गोवा महामार्गालगतच्या खाजगी क्षेत्रात किटा प्रकारच्या लाकडाचा मोठा साठा आणि कोळशाच्या 111 पोती आढळून आल्या. या वेळी गस्ती पथकाकडून विचारणा केली असता तिथे असलेल्या विलास सुर्वे यांनी हा माझा परवान्याचा कोळसा असल्याचे सागितले, पण वनखात्याच्या पथकाने त्याचे कागदपत्र तपासले असता त्यांचे समाधान झाले नाही. परवाना हा 2015 सालचा असल्याचे निदर्शनास आले आणि कोळसा तर अगदी ताजा असल्याचे मत वनखात्याच्या अधिकार्यांनी सांगितले. याप्रमाणे त्याच क्षणी परिसराचा पंचनामा करून कोळशाच्या 43350 रुपये किमतीच्या 111 पोती (वजन 2550 किलो) जप्त करून विलास सुर्वे यांच्यावर वनखात्याच्या कायद्याप्रमाणे कोळसा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
हे धाडसत्र सुरू असताना विलास सुर्वे यांनी वनखात्याच्या पथकासोबत आलेल्या वनप्रेमी विनोद पालकर यांना पाहिल्यावर यानेच सांगितले काय, असे म्हणत सुर्वे यांनी पालकर यांच्यावर हल्ला केला. काठीने हाताचा कोपरा आणि पायावर मारहाण केली. यात सुर्वे यांच्या कामगारांनी देखील पालकर यांना मारहाण केली, अशी तक्रार विनोद पालकर यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली असून माणगाव पोलिसांनी त्यांना मेडिकल करण्यास पाठवले असल्याचे समजते. त्यानुसार माणगाव पोलिसांनी विलास सुर्वेवर भादंवि कलम 324 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास माणगाव पोलीस करीत आहेत. दरम्यान, कोळशासोबत तिथे असलेला वृक्षतोडीच्या साठ्याची मात्र माणगाव वनखात्याच्या अधिकार्यांना अधिक चौकशी करण्यास फिरत्या पथकाने सांगितले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कोकणात होणारी वृक्षतोड आणि किटा व कोळशाचे उत्पादन व त्याची अवैध वाहतूक ही बहुचर्चित आहे, परंतु त्या त्या परिसरातील वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी यांना सगळे माहीत असूनही कोणतीच कारवाई करीत नाही. उलट खाजगी क्षेत्रात एका परवान्याच्या नावाखाली असंख्य झाडे तोडण्याचा सपाटा जणू वनखात्याने लावलाय की काय हीच शंका सर्वसामान्यांना येते. आजची ही धाड मुंबई-गोवा महामार्गालगत रातवड गावाच्या हद्दीत घडली. विलास सुर्वे हे काँग्रेसचे माणगाव तालुकाध्यक्ष असून राजकीय पडद्याआड रायगड जिल्ह्यात असे अनेक राजकीय प्रतिनिधी वनखात्याची विल्हेवाट लावत असल्याचे दिसून येते. आज झालेल्या या कारवाईमुळे महाड, पोलादपूर, माणगावसह रायगड जिल्ह्यातील अशी बेसुमार अनैसर्गिक वृक्षतोड आणि कोळसा उत्पादन करणार्या महाभागांना वेसण लागेल काय, हाच खरा प्रश्न आहे.