पनवेल ः रामप्रहर वृत्त
विजयादशमीनिमित्त सीमोल्लंघन करण्याची हिंदु धर्मात परंपरा आहे. या परंपरेला अनुसरून दरवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलन केले जाते. 1925 साली दसर्याच्याच दिवशी संघाची स्थापना झाली होती. त्यामुळे संघामध्ये दसर्याच्या पथसंचलनाला विशेष महत्त्व असते. गेली दोन वर्षे कोरोना निर्बंधामुळे पथसंचलन झाले नव्हते. त्यामुळे यंदा संघ स्वयंसेवकांमध्ये वेगळाच उत्साह होता. अतिशय शिस्तबद्ध व दिमाखदार असे संचलन पनवेलकरांना अनुभवायला मिळाले. रचना व प्रार्थना करून शहर पोलीस ठाण्यापासून संचलन सुरू झाले. घोष (बँड) पथक, ध्वज दंडासह करंजाडेपासून ठाणा नाका एवढ्या भागातील गणवेशातील शंभर ते सव्वाशे स्वयंसेवकांचे हे संचलन एचओसी कॉलनी, कफ नगर, सावरकर पुतळा अशा मार्गाने गेले. वाटेत ठिकठिकाणी ध्वजासह स्वयंसेवकांवर लोकांनी पुष्पवृष्टी केली. संचलनाची सांगता शहरातील चिंतामणी हॉल येथे झाली. हॉलमध्ये शस्त्रपूजन, प्रात्यक्षिके व्याख्यान असा कार्यक्रम झाला. या वेळी स्वयंसेवकांकडून आकर्षक प्रात्यक्षिके सादर केली गेली. वक्ते म्हणून संघाच्या कोकण प्रांताच्या महाविद्यालयीन विभागाचे प्रमुख सुहास पोतदार उपस्थित होते. त्यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त पोलिस अधिकारी तथा आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग शिक्षक हनुमंतराव शिंदे उपस्थित होते.