प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांचे आवाहन
पेण ः प्रतिनिधी
पेण तालुक्यासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याबाहेरून येणार्या नागरिकांनी आपली माहिती न लपविता प्रशासनाला माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पेणच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी केले आहे.
चौथ्या टप्प्यामध्ये लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता आल्याने अनेक नागरिक जिल्ह्याबाहेरून मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे या भागातून स्थलांतरित होऊन आपल्या मूळगावी येत आहेत. त्यासाठी प्रशासनाने सर्व दक्षता घेऊन वेगवेगळ्या उपाययोजना केल्या असल्या तरी काही नागरिक छुप्या मार्गाने जिल्ह्यासह पेण तालुक्यात प्रवेश करीत आहेत. तरी जिल्ह्याबाहेरून येणार्या नागरिकांनी आपली माहिती प्रशासनाला कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पेण तालुक्यातील पाच पॉझिटिव्हपैकी तीन जण ठाणे जिल्ह्यातून आले आहेत, तर वडखळ येथील आजी व तिचा नातू यांनादेखील मुंबईला उपचारासाठी गेले असता कोरोनाचा संसर्ग झाला. त्यातील नातू बरा झाला आहे. वेळेवर माहिती मिळाल्यास रुग्णावर योग्य ते उपचार करता येतात. खारपाडा येथे प्रशासनाने जिल्ह्याबाहेरून येणार्या नागरिकांची नोंद करण्यास 15 दिवसांपासून सुरुवात केली आहे, मात्र असे असतानाही काही बेजबाबदार नागरिक माहिती न देता येत आहेत. कोणालाही अशी माहिती समजल्यास त्वरित तहसील कार्यालय अथवा पेण पोलीस ठाण्यात कळवावे, जेणेकरून पुढील धोका टळू शकेल. तसेच माहिती घेण्यासाठी गावोगावी येणार्या अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांना योग्य ती माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी केले आहे.