पदाधिकारी शिंदे गटात दाखल
पनवेल ः वार्ताहर
उद्धव ठाकरे यांच्यासमोर आम्ही हलणार नाही. उरण विधानसभा मतदारसंघातील एकही पदाधिकारी कुठे गेला नाही आणि जाणार नाही, अशी वलग्ना जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांनी पक्षप्रमुखांसमक्ष केली, मात्र काही तासांतच त्यांना धक्का बसला आहे. उलवे शहर प्रमुख मनोज घरत यांच्यासह महिला शहर प्रमुख, शाखा प्रमुख यांनी युवासेनेचे कोअर कमिटी सदस्य रूपेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गटात प्रवेश केला आहे.
राज्यभर ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार लढाई सुरू असताना ठाकरे गटातून उरण विधानसभेच्या सर्व पदाधिकार्यांना मातोश्री निवासस्थानी बोलाविण्यात आले. या वेळी उद्धव ठाकरे यांच्यासमोर बोलताना जिल्हा प्रमुख मनोहर भोईर यांनी, आम्ही हलणार नाही आणि एकही पदाधिकारी कुठे गेला नाहीय व जाणार नाही, अशी वलग्ना केली, तर उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन व टाळ्या वाजवून दाद दिली, मात्र काही तासांतच मनोहर भोईर यांना धक्का बसला. युवासेनेचे कोअर कमिटी सदस्य रूपेश पाटील यांनी उरण विधानसभा उलवे शहर प्रमुख मनोज घरत, महिला शहर प्रमुख स्नेहल घरत, महिला शाखा प्रमुख व शिवसेना शाखा प्रमुख यांना थेट शिंदे गटात घेऊन उद्धव गटाला धक्का दिला आणि मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाला खिंडार पाडले. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनोज घरत आणि अन्य पदाधिकार्यांचे स्वागत केले.
या पक्षप्रवेश कार्यक्रमास उरण विधानसभा उपजिल्हा प्रमुख अतुल भगत, खारघर शहर प्रमुख प्रसाद परब उपस्थित होते. काही दिवसांनी प्रत्येक आठवड्यात उरणमधून शिंदे गटात पक्षप्रवेश होणार असल्याचे रूपेश पाटील यांनी या वेळी जाहीर केले.