Breaking News

पनवेलचे सुपुत्र सत्यवान पाटील सुखरूप

पनवेल : बातमीदार

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. या वेळी सोशल मीडियावर पनवेल तालुक्यातील केळवणे येथील एका जवानाला वीरमरण आले असल्याचे वृत्त व्हायरल झाले होते, मात्र सत्यवान पाटील हे सुखरूप असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.

14 फेब्रुवारी रोजी पुलवामा जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर महामार्गावरील अवंतीपुरा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत; तर काही जवान जखमी असल्याची प्राथमिक माहिती देण्यात येत आहे. दहशतवाद्याने 200 किलोहून अधिक स्फोटके भरलेली मोटार जवानांच्या ताफ्यावर धडकवली. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

या हल्ल्यात पनवेल तालुक्यातील सत्यवान पाटील यांना वीरमरण आले असल्याचे सोशल मीडियावर वेगाने पसरत होते. त्यामुळे समस्त पनवेलकर चिंतेत पडले होते. याबाबत पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी गावामध्ये चौकशी करण्यासाठी मंडळ अधिकारी व तलाठी पाठवले असल्याची माहिती दिली होती; तर केळवणे गावातील सरपंच अश्विनी संदीप घरत व सत्यवान पाटील यांच्या पत्नी अश्विनी पाटील यांच्याशी संपर्क साधण्यात आला. या वेळी सत्यवान पाटील हे सुखरूप असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली, तसेच हल्ला होण्यापूर्वी दुपारी 2 वाजता सत्यवान यांच्यासोबत बोलणे झाले होते, मात्र हल्ला झाल्यानंतर त्यांच्याशी बोलणे होत नव्हते. त्यामुळे त्यांच्या पत्नीदेखील घाबरल्या होत्या. सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या पोस्टमुळे तर पाटील यांचे कटुंब धास्तावले होते. अखेर त्यांचा जीव भांड्यात पडला. सत्यवान पाटील हे 2008 साली सैन्यात भरती झाले असून, त्यांना दोन वर्षांचा मुलगा आहे. पाटील हे श्रीनगरमध्ये सुखरूप असल्याचे पत्नी अश्विनी पाटील यांनी सांगितले.

Check Also

‘गीतगंधाली’तून उलगडला कर्मवीर अण्णांचा जीवनपट

सातारा येथील कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती सातारा : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त कर्मवीर …

Leave a Reply