Breaking News

खांदा कॉलनीत रविवारी मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप महाशिबिर

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, लोकनेते रामशेठ ठाकूर यांची लाभणार प्रमुख उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ, भारतीय जनता पक्ष पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 16) खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. यंदाचे हे 13वे महाशिबिर असून त्याचे उद्घाटन सकाळी 9 वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर असणार आहेत. या वेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. या अंतर्गत हे महाशिबिर होणार आहे. या महाशिबिराच्या अनुषंगाने प्राथमिक तपासणी शिबिर नुकतेच झाले असून मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप महाशिबिर रविवारी खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत होणार आहे. या महाशिबिरात सर्वसाधारण रोग, महिलांचे आजार, हृदयरोग, हाडांचे रोग, मधुमेह, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, बालरोग, त्वचा व गुप्तरोग तपासणी, दंतरोग तपासणी, नाक-कान-घसा, सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, ईसीजी तपासणी, कॅन्सर तपासणी, क्षयरोग तपासणी आणि औषधोपचार मोफत देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर 0 ते 18 वयोगटापर्यंत 2डी इको तपासणी व हृदय शस्त्रक्रिया, डोळ्यांची तपासणी व चष्मे वाटप, तसेच अपंगांना तीनचाकी सायकल वाटप, कर्णबधिरांना श्रवणयंत्र, देण्याबरोबरच मोफत कृत्रिम हात व पाय अर्थात जयपूर फूट बसविण्याचे शिबिरही या वेळी होणार आहे. आयुष्यमान भारत डिजिटल कार्डसुद्धा या शिबिरात तयार करून देण्यात येणार आहेत तसेच दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. महाशिबिरात साधू वासवानी मिशन पुणे, लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट, एमजीएम हॉस्पिटल कामोठे व कळंबोली, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल नेरूळ, भारती विद्यापीठ खारघर, तेरणा मेडिकल कॉलेज नेरूळ, येरळा मेडिकल ट्रस्ट, साईट फर्स्ट केअर, नायर हॉस्पिटल, व्हिट सेंटर, शंकरा आय हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल, टाटा कॅन्सर हॉस्पिटल परळ, सत्य साई संजिवनी हॉस्पिटल खारघर, शुश्रूषा हॉस्पिटल पनवेल या नामांकित वैद्यकीय संस्थांचा सहभाग असणार आहे. या महाशिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष व भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आदेश पाथरे, भाजप खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील यांनी केले आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply