पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये मुलींचे आरोग्य समुपदेशन करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेचा महत्त्वाकांक्षी अनिवासी रयत गुरुकुल प्रकल्प राबविला जातो. या प्रकल्पांतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. विविध विषयांवर बाह्य तज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने आयोजित करण्यात येतात. त्यातील आरोग्य समुपदेशन या सदराखाली विद्यार्थिनींसाठी ’मासिक पाळी व्यवस्थापन’ याविषयीचे मार्गदर्शन मंगळवारी (दि. 18) आयोजित करण्यात आले. शालेय विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आलेल्या ह्या आरोग्य समुपदेशनामध्ये आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट च्या उजास फाऊंडेशन यांच्या वतीने दीपाली अनिता अनंत यांनी मुलींना वयात येताना होणार्या शारीरिक बदलांबाबत शास्त्रीय माहिती देवून मासिक पाळी विषयी असणारे गैरसमज दूर केले. लहान मुलींना पहिल्यांदा येणार्या मासिक पाळीच्या वेळेस मनोबल,मनोधैर्य वृद्धिंगत करण्यासाठी त्यांची मानसिक तयारी व त्यावेळेस घ्यावयाची योग्य काळजी याविषयी मार्गदर्शन केले सकाळ व दुपार अशा दोन सत्रात झालेल्या या आरोग्य समुपदेशन शिबिरात सकाळी इयत्ता पाचवी ते सातवीच्या मुली व दुपार सत्रात इयत्ता आठवी ते दहावीच्या मुलींना मार्गदर्शन करण्यात आले. या समुपदेशन सत्रामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शिका दिपाली अनिता अनंत यांचे स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाच्या विज्ञान अध्यापिका चारुशीला ठाकूर यांनी केले. सकाळ सत्रात अस्मिता पाटील-वर्तक, प्रणाली पाटील व सुजाता शेलार-चौधरी आदी उपस्थित होत्या तर दुपार सत्रात चारूशिला ठाकूर, उर्मिला गोंधळी व द्रौपदी वर्तक आणि विद्यार्थीनी उपस्थित होत्या.