शिवसेना शिंदे गटाची खोपोली पालिका मुख्याधिकार्यांकडे मागणी
खोपोली : प्रतिनिधी
येथील छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी खोपोलीतील बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) च्या पदाधिकार्यांनी मुख्याधिकारी अनुप दुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून शासनाच्या वतीने वेगवेगळ्या विविध विकास कामाच्या पूर्ततेसाठी खोपोली नगरपालिकेला वीस कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ती सर्व विकासकामे तातडीने मार्गी लावावी, अशा स्वरूपाची आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या विकासकामांमध्ये शहरातील रखडलेली भुयारी गटारी योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाची नवीन इमारत, तसेच छत्रपती शाहू महाराज नाट्यगृह दुरुस्ती करणे व इतर अनेक कामांचा समावेश आहे. बाळासाहेबांची शिवसेनेच्या शिष्टमंडळाने नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या निवेदनात खोपोलीतील छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या शिष्टमंडळात शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख संदीप पाटील, शहर संघटक तात्या रिठे ,माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, माजी शहरप्रमुख राजन सुर्वे यांच्यासह अन्य पदाधिकार्यांचा समावेश होता. मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी निवेदन स्वीकारले. व विकासकामे मार्गी लावली जातील असे सांगितले.