उरण : वार्ताहर
उरण तालुक्यातील कळंबुसरे, कोप्रोली, दिघाटी, केळवणे, साई तसेच अन्य भागातील शेतकर्यांच्या रब्बी पिकांच्या पेरणीची कामे परतीच्या पावसाचा जोर कायम असल्यामुळे लांबणीवर जाणार असल्याचे मत चिरनेरचे कृषीमित्र शेतकरी प्रफुल्ल खारपाटील यांनी व्यक्त केले. यंदाही परतीचा पावसाचा प्रवास विलंबाने होत आहे. त्यामुळे परिसरातील काही ठिकाणच्या भात खाचरात अजूनही गुडघाभर पाणी असल्यामुळे भात पिकांच्या कापणीची कामे लांबणीवर जाणार आहेत. याचा फटका रब्बी पिकांच्या पेरणीला बसणार आहे. सध्या काही ठिकाणी भात पिके तयार होऊन कापणीला आली आहेत, तर काही भातपिके अजून हिरवीच असून ती तयार होण्याच्या स्थितीत आहेत. यंदा राज्यात सर्वदूर मोसमी पाऊस बरसला. पावसाचा जोर कायम असल्यामुळे भातपिकांच्या खाचरात अद्याप पाणी व चिखल आहे. येथील काही शेतकर्यांच्या शिवारातील नवीन संकरित जातीची भात पिके अजून पूर्ण तयार झाली नाहीत. शिवाय यातील काही पिकांची उंची व वाढ झपाट्याने झाली असल्यामुळे बर्याच ठिकाणच्या भातखाचरातील उंच वाढलेली पिके खाली कोसळून पडली आहेत. त्यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परतीच्या पावसामुळे कापणीचा हंगाम पुढे गेला आहे. पाऊस थांबला तर कापणीला सुरुवात होऊन नोव्हेंबरअखेर रब्बी पिकांच्या पेरणीला सुरुवात करता येईल, मात्र पाऊसाच्या लहरीपणामुळे कापणीचा व रब्बी पिकांच्या पेरणीचा हंगाम लांबणीवर जात असल्यामुळे येथील शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाने प्रत्यक्ष पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील व परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.