पुणे ः प्रतिनिधी
अहमदनगर येथून आलेल्या तिघांनी प्यासा हॉटेलचा पत्ता अगोदर का सांगितला नाही म्हणून एका युवकावर छर्याच्या बंदुकीतून गोळीबार केला. अगोदर पत्ता माहीत नाही, असे का सांगितलेस म्हणून दारू पिल्यानंतर त्याला मरीआई गेटजवळ सोडताना त्याच्यावर छर्याच्या बंदुकीतून गोळीबार करून जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे़.
या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी अंबादास होंडे (28) याला अटक केली असून त्याच्या दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला़. या प्रकरणी सनी चौधरी (17) याने फिर्याद दिली आहे. छर्याच्या बंदुकीतील गोळी चौधरीच्या पायाला लागून जबर दुखापत झाली आहे़.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, सनी चौधरी हा सुब्बाननल्लाह हॉटेलमध्ये जेवण करून घरी जात होता. त्यावेळी पांढर्या रंगाच्या कारमधून तिघे जण आले. त्यांनी सनीला प्यासा हॉटेल कोठे आहे, असे विचारले. त्याने सुरुवातीला मला माहिती नाही, असे सांगितले. त्यांनी दमबाजी केल्यानंतर त्याने प्यासा हॉटेल दाखविले़, मात्र अगोदर पत्ता का सांगितला नाही याचा राग येऊन त्यांनी सनीला मारहाण करून शिवीगाळ केली. मारहाण करून होंडे याने त्याच्याकडील छर्याच्या बंदुकीतून गोळीबार केला़. त्यात तो जखमी झाला़.
पोलिसांनी त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. यानंतर हा प्रकार शिवाजी रोडवर घडल्याने फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक यश सूर्यवंशी यांनी या प्रकरणी अधिक तपास करून एकाला अटक करण्यात आली आहे.