मुंबई ः प्रतिनिधी
प्रवीण परदेशी यांनी नुकताच मुंबई महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव राहिलेल्या प्रवीण परदेशी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली, तर मावळते मुख्य सचिव यूपीएस मदान यांची मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार म्हणून (करार पद्धतीने) प्रथम एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने हा शासन आदेश काढला आहे. पावसाळ्यातील आव्हाने समोर आहेत. त्यामुळे मुंबईतील पाणी तुंबणार्या ठिकाणी विशेष लक्ष देणार आहे. नालेसफाईची कामे त्वरित मार्गी लावणार, तसेच मुंबईकरांना यंदाचा पावसाळा सुसह्य जाईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन नवे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.
इतर अनेक देशांमध्ये ज्या ठिकाणी मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे, त्या देशांतही कोस्टल रोडसारखे प्रोजेक्ट आहेत. कोस्टल रोड हा मुंबईकरांच्या हिताचा प्रकल्प आहे. सर्वांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प पूर्ण करणार आहोत. यासाठी कोस्टल रोडबाबत कोळी बांधवांमध्ये असलेली नाराजी दूर करणार आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज असल्याचेदेखील परदेशी यांनी सांगितले, तसेच विकास आराखड्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. याबाबत अनेक सूचना-हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्या विचारात घेऊन काम करणार, असेही त्यांनी सांगितले.
प्रवीण परदेशी यांनी घोटाळेबाजांवर कारवाई होणार, पण यात
निर्दोष भरडले जाणार नाहीत याचीही काळजी घेणार असल्याचे नमूद केले. अधिकारी जनतेचे काम करण्यासाठी असतात. महापालिकेत कुठलाही गैरव्यवहार होणार नाही. महापालिकेत सत्ताधारी-प्रशासन यांच्यात संवाद आहेच, पण तो आणखी मजबूत करणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. मुंबई महापालिकेचे मावळते आयुक्त अजोय मेहता यांनी मुंबई महापालिकेच्या नव्या आयुक्तांना नव्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
2014मध्ये मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपले प्रधान सचिव म्हणून प्रवीण परदेशी यांची नियुक्ती केली होती. ते मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. बेधडक निर्णय घेणारे, दूरदर्शी व अभ्यासू प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रवीण परदेशी ओळखले जातात. लातूर भूकंपादरम्यान त्यांनी केलेल्या कामाचे राज्यातच नव्हे, तर देशातही भरभरून कौतुक झाले. या शाबासकीने त्यांना नवे बळ मिळाले होते. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी आपल्या कामाचा धडाका कायम ठेवला आहे. प्रत्येक जबाबदारी अगदी समर्थपणे पार पाडली आहे. परदेशी यांचा वनांचा दांडगा अभ्यास असून जंगले जगली पाहिजेत, प्राण्यांना त्यांचे हक्काचे घर मिळालेच पाहिजे, याबाबतही ते आग्रही आहेत.